तिरुपती देवस्थान यंत्रणा स्थापणार
वृत्तसंस्था / तिरुपती
तिरुपती प्रसाद लाडूंमध्ये गाय आणि डुकराच्या चरबीच्या भेसळ प्रकरणाचे पडसाद आता साऱ्या जगात उमटण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकार आणि देवस्थान यांनी समिती स्थापन केली असून दोषींची गय करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात तिरुपती देवस्थानाने आता एक मोठा निर्णय घेतला असून प्रसादाचे परीक्षण करण्यासाठी देवस्थान स्वत:ची यंत्रणा स्थापन करणार आहे. या देवस्थानाच्या व्यवस्थापनावर आंध्र प्रदेश सरकारचे नियंत्रण असून सरकारनेही या निर्णयाला मान्यता दिली आहे.
सध्या या देवस्थानच्या व्यवस्थापनाजवळ स्वत:ची प्रयोगशाळा आहे. तथापि, या प्रयोगशाळेतील उपकरणे सर्वसामान्य आहेत. आता नवी अत्याधुनिक उपकरणे विकत घेतली जाणार असून प्रसाद निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचीही चाचणी केली जाणार आहे. आता देवस्थानाचा प्रसाद अत्यंत शुद्ध स्वरुपात उपलब्ध असून भाविकांनी कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन देवस्थान व्यवस्थापाने पेले आहे. दोषी कंपन्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
चारही अहवाल समान
प्रसादात भेसळ असल्याची शंका आल्यानंतर चार वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून परीक्षणे करुन घेण्यात आली आहेत. या चारही परीक्षणांचे अहवाल समान असून प्रसादाच्या लाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भेसळ गाय आणि डुक्कर आदी प्राण्यांच्या चरबीची आहे. ही चरबी लाडू करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या तुपात करण्यात आली होती. तुपाचे वजन वाढविण्यासाठी चरबी घालण्यात आली असावी किंवा हिंदूंच्या धर्मभावना दुखाविण्याचे हे कुटील कारस्थान असावे, अशी अनुमाने व्यक्त होत आहेत.
अमूलची एक्स युजरविरोधात तक्रार
गुजरातच्या अमूल या कंपनीने काही एक्स युजर्सविरोधात तक्रार सादर केली आहे. तिरुपती प्रसादासाठी या कंपनीचे तूप उपयोगात आणण्यात आले होते, असा अपप्रचार या एक्स युजर्सनी चालविलेला आहे. यामुळे कंपनीची मानहानी होत आहे, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. काही एक्स युजर्स लोकांची दिशाभूल होईल असा अपप्रचार कंपनीसंदर्भात करीत आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे, असेही तक्रारीत नोंद करण्यात आले आहे.