टिप्पर ट्रकने घेतला निष्पाप मातेचा बळी
सात वर्षीय बालकाचे हरपले मातृछत्र : पती किरकोळ जखमांवर बचावला ; बालक गोमेकॉत झुंज देत आहे मृत्यूशी : फोंड्यात बेदरकारपणामुळे अपघात
फोंडा : वारखंडे-पंडितवाडा जंक्शनवर टिप्पर-ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली. स्वाती अंकुश राठोड (32 वर्षे, रा. नागामशिद कुर्टी, मूळ बीड, महाराष्ट्र) असे मृत महिलेचे नाव आहे. आयुष अंकुश राठोड हा तिचा 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याला बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातानंतर बराच वेळ पोलिस घटनास्थळावर पोचले नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
प्राप्त माहितीनुसार टिप्पर ट्रक जीए 08 यू 0812 वारखंडे येथील एका बांधकाम स्थळावर माती-दगड ने-आण करत होता. बांधकाम स्थळावर जात असताना या ट्रकने वारखंडे पंडितवाडा जंक्शनवर दुचाकी जीए 05 व्ही 1597 ज्युपिटर दुचाकीला धडक दिली. त्यामुळे स्वाती ही ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडली तसेच तिचा 7 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. चालक तिचा पती किरकोळ जखमांवर बचावला. मुलाच्या दोन्ही हाताला फ्रॅक्चर असून त्याला बांबोळी येथे हलविण्यात आले असून महिलेला उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कंत्राटदार व बांधकाम मालकाला घटनास्थळावर आणण्याची मागणी
अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी महिलेला रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी फोंडा पोलिसानी घटनास्थळी पंचनामा केला. जोपर्यंत वाहनचालक, बांधकाम कंत्राटदाराला घटनास्थळावर हजर करीत नाही तोपर्यंत वाहन हलविणार नाही, असा पवित्रा घेतल्याने सुमारे अडीच तास वाहतूक खोळंबली. तणावाची स्थिती हाताळण्यात फोंडा पोलिसस्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर हतबल झाल्याचे दिसले. यावेळी फोंड्याचे भाजपा नेते विश्वनाथ दळवी घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण असफल झाला. स्थानिक आपल्या मागणीवर अडून बसल्याने उशिरा रात्रीपर्यंत तणावाची परिस्थिती होती.
अरूंद रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक बेदरकार
वारखंडे रस्ता आधीच अरूंद असून या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नेहमी जास्त असते. रस्त्याच्या दुतर्फा येथील स्थानिकांची घरे असून अवजड वाहनांनी दक्षता बाळगणे आवश्यक असतानाही कंत्राटदाराकडून बेदरकार वाहतूक होत असते. माती, दगड वाहतूक करतानाही प्लास्टिक आच्छादन न वापरता वाहतूक करण्यात येत आहे. वाहतुकीमुळे रस्ताही चिखलमय होत असून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पोलिसस्थानकात देण्यात आल्या होत्या. तरीही कोणतीच उपाययोजना अजूनपर्यत करण्यात आलेली नाही.फॉरेन्सिक टिमने घटनास्थळावर ट्रकच्या चाकांना लागलेले रक्ताचे नमूने गोळा केले आहेत. घटनास्थळावर उशिरा रात्रीपर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन नाईक अधिक तपास करीत आहे.