मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ यांची समयोचित अर्धशतके
ऑस्ट्रेलियाला 241 धावांची आघाडी, शाहीन आफ्रिदी, हमझाचे प्रत्येकी तीन बळी
वृत्तसंस्था /मेलबर्न
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून पाकवर आघाडी यापूर्वीच घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा जमवल्या. त्यानंतर पाकने 6 बाद 194 या धावसंख्येवरून गुरुवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या चार गड्यांनी 70 धावांची भर घातली. पाकच्या पहिल्या डावात अब्दुल्ला शफीकने 5 चौकारासह 62, कर्णधार शान मसूदने 1 षटकार आणि 3 चौकारासह 54, मोहमद रिझवानने 1 षटकार आणि 1 चौकारासह 42 तर अमिर जमालने 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 33 तसेच शाहीन आफ्रिदीने 4 चौकारासह 21 धावा जमवल्या. अमीर जमाल आणि रिझवान यांनी सातव्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केल्याने पाकला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 48 धावात 5 तर फिरकी गोलंदाज लियॉनने 73 धावात 4 तसेच हॅझलवूडने एक गडी बाद केला. उपाहारापूर्वीच पाकचा पहिला डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. शाहीन आफ्रिदीने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलमीच्या ख्वाजाला खाते उघडण्यापूर्वीच रिझवानकरवी झेलबाद केले. त्यानंतर आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना लाबूशेनला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 4 धावा जमवल्या. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 3 षटकात 2 बाद 6 धावा जमवल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर मीर हमझाने वॉर्नरचा त्रिफळा उडवला. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. मीर हमझाने ट्रेविस हेडला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचित केले.
ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 4 बाद 16 अशी केविलवानी होती. स्टिव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श या जोडीने संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 107 धावापर्यंत मजल मारली होती. मार्श आणि स्मिथ या जोडीने चहापानापर्यंत पाचव्या गड्यासठी अभेद्य 91 धावांची भर घातली होती. मार्शने 70 चेंडूत 8 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. मार्शने स्मिथ समवेत शतकी भागीदारी 183 चेंडूत झळकवली. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पाकचा गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे आणखी दोन फलंदाज बाद केले. आक्रमक फटकेबाजी करणारा मिचेल मार्श मीर हमझाच्या गोलंदाजीवर सलमानकरवी झेलबाद झाला. मार्शचे शतक चार धावांनी हुकले. त्याने 130 चेंडूत 13 चौकारासह 96 धावा जमवल्या. आफ्रिदीने स्टिव्ह स्मिथला झेलबाद केले. त्याने 176 चेंडूत 3 चौकारासह 50 धावा जमवल्या. मार्श आणि स्मिथ या जोडीने पाचव्या गड्यासाठी 143 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 187 धावापर्यंत मजल मारली. केरे 16 धावावर खेळत आहे. पाकतर्फे आफ्रिदी आणि हमझा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 96.5 षटकात सर्वबाद 318, पाक प. डाव 73.5 षटकात सर्वबाद 264 (अब्दुल्ला शफीक 62, शान मसूद 54, रिझवान 42, हमीर जमाल नाबाद 33, शाहीन आफ्रिदी 21, अवांतर 23, कमिन्स 5-48, लियॉन 4-73, हॅझलवूड 1-43), ऑस्ट्रेलिया दु. डाव 62.3 षटकात 6 बाद 187 (मिचेल मार्श 96, स्मिथ 50, कॅरे खेळत आहे 16, अवांतर 5, शाहीन आफ्रिदीन 3-58, मीर हमझा 3-27).