For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : पंतप्रधानांचे 'स्वच्छ भारत' मिशन राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ

04:37 PM Feb 05, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   पंतप्रधानांचे  स्वच्छ भारत  मिशन राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ
Advertisement

                        स्वच्छ भारत मिशन कर्मचारी प्रशासनाच्या उदासीनतेवर संतप्त

Advertisement

गोडोली : देशाला स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला सातारा जिल्ह्यात जमिनीवर उतरवणारे 'स्वच्छ भारत मिशन'चे कंत्राटी कर्मचारी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजत आहेत. गेली २५ वर्षे निष्ठेने सेवा बजावूनही, मागील पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर आता 'उदरनिर्वाहासाठी अवयव विकण्याची' अत्यंत भयावह वेळ आली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दि.४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या दारात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

प्रशासकीय 'फंडा' आणि कर्मचाऱ्यांची होरपळ

Advertisement

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात हे तज्ञ आणि कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. साताऱ्याला स्वच्छतेत नेहमीच अग्रेसर ठेवण्यात हेच कर्मचारी आघाडीवर असून त्यांचा याकामी मोलाचा वाटा आहे. मात्र, प्रशासनाने मानधन देताना विभागाच्या 'निधी खर्चाच्या आधारावर कर्मचाऱ्यांना मानधन' देण्याचा अजब फंडा वापरल्याने या कर्मचाऱ्यांची चूल विझली आहे.

दैनंदिन जगण्याचे संकट

५ महिने मानधन नसल्याने मुलांची शालेय फी भरलेली नाही, घराचे भाडे आणि कर्जाचे हप्ते थकले आहेत, दवाखान्याचा खर्च, किराणा मालासाठी उधारी घेण्याची मर्यादा संपली आहे. "आम्ही निष्ठेने काम केले. प्रशासनाने आम्हाला इतके हतबल केले आहे की, आता अवयव विकण्याशिवाय पर्याय दिसत नाही," अशी आर्त हाक सविता भोसले या आंदोलक कर्मचाऱ्याने 'तरुण भारत'शी बोलताना दिली.

न्यायालयाचा निकालही बासनात

१० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही प्रशासन त्याकडे काणाडोळा करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. एकीकडे लाखो रुपये पगार घेणारे वरिष्ठ अधिकारी आणि दुसरीकडे पाच-पाच महिने मानधनाविना काम करणारे हे कंत्राटी कर्मचारी, अशी विदारक स्थिती सध्या जिल्हा परिषदेत स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागात पाहायला मिळत आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन तीव्र होणार जोपर्यंत थकीत मानधन मिळत नाही आणि न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वेळेत दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.