काँग्रेसच्या गॅरंटी योजनांमुळे भाजपवाल्यांवर‘मोदी की गॅरंटी’ म्हणण्याची वेळ
पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते आमदार आर. व्ही. देशपांडे यांचा टोला
कारवार : जनतेच्या हितासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारने यशस्वीपणे हाती घेतलेल्या गॅरंटी योजनांची चेस्टा, टीका, टिप्पणी करणारे भाजपवाले आता गॅरंटीच्या पाठीमागे लागले आहेत. भाजपवाल्यांवर आता मोदी की गॅरंटी असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे, अशी टीका राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केली. ते येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपवाले यावेळी आपण 400 चा आकडा पार करणार असा दावा गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. तथापि आता त्यांना 400 चे उद्दिष्ट गाठणे किती कठीण आहे हे कळून चुकले आहे. म्हणूनच आता ते काँग्रेसने अंमलबजावणी केलेल्या गॅरंटीची कॉपी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. म्हणून आता ते ‘मोदीची गॅरंटी’ची ढोल पीटत आहेत. ते पुढे म्हणाले, मंड्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे कर्नाटक मोठ्या अडचणीत सापडले आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळाने जनता होरपळून निघालेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येने उग्र स्वरुप धारण केले आहे. तरीसुद्धा मोदी यांनी आपल्या भाषणात राज्यातील दुष्काळी परिस्थितीबद्दल एक शब्द उच्चारला नाही. कराच्या माध्यमातून राज्यातून मोठी रक्कम केंद्र सरकार गोळा करीत आहे. तथापि राज्य सरकारला केंद्राकडून अनुदान दिले जात नाही.
आश्वासन 20 कोटीचे ,पूर्तता दीड कोटीची
भाजप नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येकवर्षी दोन कोटी नवीन रोजगार निर्माण करू, असे भाजपने आश्वासन दिले होते. त्या हिशेबाने देशांत गेल्या दहा वर्षांत 20 कोटी रोजगार निर्मिती व्हायला हवी होती. तथापि गेल्या दहा वर्षांत केवळ दीड कोटी रोजगार निर्मिती झाली आहे. गेल्या दहा वर्षांत किती काळा पैसा सरकारने देशात आणला? किती लोकांच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली, याचा हिशेब द्यायला हवा. महागाईने देशवासीय हैराण झाले आहेत. भाजप सरकार गरिबांसाठी आहे की श्रीमंतांसाठी आहे हेच समजायला मार्ग नाही, असे सांगून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यातील 28 पैकी 20 ते 22 जागांवर निश्चितपणे बाजी मारणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार सतीश सैल, भीमण्णा नाईक, पालकमंत्री मंकाळू वैद्य, आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर, निवेदीत अल्वा आदी उपस्थित होते.