डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वेळ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा शालांत मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत 2047’चे जे स्वप्न बाळगले आहे. त्यामध्ये शिक्षण क्षेत्राचा अधिक समावेश आहे. हे स्वप्न पूर्ण करताना राज्यातील शाळांच्या इमारती सुसज्ज करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही भविष्यासाठी सक्षम केले जाईल. झेन-जी, झेन-एक्स हे डिजिटल तंत्रज्ञान आता आत्मसात करण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञान मुलांमध्ये ऊजविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतल्यास मुलांच्या शिक्षणाचा पाया पुढील पन्नास वर्षांसाठी सक्षम करता येऊ शकतो. त्यासाठी शिक्षकांनी मुलांमधील शैक्षणिक व इतर कौशल्ये तपासून त्यांना त्याप्रमाणे तयार करावे. हे करण्याचा विडा सरकारनेही उचलला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच नव्याने सौंदर्यीकरण केलेल्या मंडळाच्या वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे व आमदार दाजी साळकर उपस्थित होते.
सुप्त गुणांना दिशा द्यावी
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांनी ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांची क्षमता आणि कौशल्य ओळखायला हवे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना योग्य दिशा दिली तर ते पुढे जाऊ शकतात. राज्यातील शासकीय कामांमध्ये आता कौशल्याचा वापर अधिक होत आहे, त्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिक्षण मंडळाचे कार्य चांगले
मंत्री खंवटे म्हणाले, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य काम केले आहे. वेळोवेळी बदलही केले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. गेल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण मंडळाने चांगले विद्यार्थी घडविण्यास मोठे योगदान दिलेले आहे. आता पुढील काळ हा ‘विकसित भारत 2047’ चा आहे. पंतप्रधान मोदी यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तसेच विकसित राज्य, देश घडविण्यासाठी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना कौशल्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गुऊकुल मॉडेल, ज्ञानद्वार संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात बोधचिन्ह आणि हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डाचे प्रकाशन झाले. उत्कृष्ट योगदानासाठी शिक्षक व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणेशस्तुती नृत्य आणि स्वागतगीत गीत सादर केले. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी प्रास्ताविकपर भाषणात शिक्षण मंडळाच्या कार्याची माहिती दिली. सुभाष जाण यांनी सूत्रसंचालन केले.