For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेळेचे नियोजन महत्त्वाचे....

06:25 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेळेचे नियोजन महत्त्वाचे
Advertisement

वैदेही व विदुला दोघी सख्ख्या बहिणी. दोघींचेही एकमेकींसोबत सुंदर नाते!!वैदेही शाळेत कायम आघाडीवर. वक्तृत्व, लेखन, अभ्यास यात कायम अव्वल!! अर्थात त्यामुळे शाळेत सर्वांचीच लाडकी विद्यार्थिनी! शिक्षकांकडून नेहमीच तिचे कौतुक होत असे. कोणतीही स्पर्धा असावी त्यामध्ये वैदेहीने भाग घ्यावा आणि अगदी सहजपणे बक्षीस घेऊन यावे इतके साधेसरळ गणित होते. विदुला वैदेहीची धाकटी बहीण. वैदेहीच्या मानाने ती तशी साधारणच.

Advertisement

अनेकदा अगदी सहज रीतीने दोन बहिणींमध्ये कळत-नकळत तुलना होत असे. परंतु विदुलाला वैदेहीशी नाते छान असल्याने बहिणीचा कधी हेवा वाटत नसे. उलट वैदेहीविषयी अभिमान आणि कौतुकच होते. हेवा, राग हे नव्हतेच कधी!दोघींचेही नाते अगदी छान होते. कॉलेज नंतर मात्र उलट घडले. विदुलाचा यशाचा आलेख काहीसा उंचावत गेला व वैदेहीचा काहीसा कमीच होत गेला. सतत यशाची सवय झालेल्या वैदेहीला यश मिळत नाही या गोष्टीशी जुळवून घेता येत नव्हते. त्यामुळे वैदेहीचे सतत नाराज होणे, चिडचिड याचे वाढलेले प्रमाण या साऱ्याने तिची आई त्रस्त झाली होती. वैदेहीची आई तिला घेऊन माझ्याकडे आली होती. वैदेहीला पाहताक्षणी तिची अस्वस्थता जाणवत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हसूच जणू गायब झाले होते. वैदेहीजवळ बोलत असताना तिची बौद्धिक हुशारी  लक्षात येतच होती परंतु असे असूनही आपण मागे का पडतो आहोत हे तिच्या लक्षात येत नव्हते. बऱ्याचवेळा ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, एकाच वेळी अनेक गोष्टी, कामे करायला जायची परंतु वेळेच्या नियोजनाचा अभाव सारी गडबड उडवून द्यायचा. हेही करायचे आहे आणि तेही करायचे आहे परंतु त्या कामांचा, ठरवलेल्या गोष्टींचा नीट मेळ घालता यायचा नाही आणि सारी गडबड उडायची. नेमकी गल्लत तिथेच होत होती.

एका वेळी विविध काही करण्याची उर्मी होती परंतु ‘वेळेच्या नियोजनाचा अभाव’ गडबड करत होता. या उलट विदुला अगदी मोजक्मयाच गोष्टी करत होती परंतु तिचे नियोजन, वेळेची आखणी उत्तम होती. त्या बळावर ती निवडेल त्या क्षेत्रात, कामांमध्ये यशस्वी वाटचाल करत होती.

Advertisement

वैदेही भेटायला आली त्यावेळी बराच वेळ चर्चा झाली. मूल्य निश्चिती, कृती आराखडा, कामांची विभागणी, वेळेचे नियोजन अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. वैदेहीनेही टप्प्याटप्याने सारे लक्षात घेत त्यावर काम करायला सुऊवात केली.

अनेकदा असे लक्षात येते की वेळेच्या नियोजनाअभावी अनेकांची गडबड उडते. वेळेचे नियोजन नसेल तर सारे अवघड होऊन जाते. अनावश्यक तणाव टाळायचा असेल तर वेळेचे नियोजन खूप आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

मुळातच कोणतेही काम करताना, कामाचा कृती-आराखडा तयार करताना तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

  1. आपल्याला काय करायचे आहे याबाबत स्पष्टता हवी.
  2. गोष्टींचा प्राधान्यक्रम अर्थात कोणत्या गोष्टी केव्हा करायच्या ते ठरवायला हवे.
  3. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळेची आखणी करायला हवी. कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा, वेळ कुठे वाया जाऊ शकतो, तो कसा वाचवायचा यासाठी कामांची वर्गवारी पुढील गटात करता येते.

ङ महत्त्वाची आणि निकडीची कामे.

ङ निकडीची परंतु कमी महत्त्वाची.

ङ महत्त्वाची पण निकड नसलेली कामे.

ङ ना महत्त्वाची ना तातडीची कामे.

पहा हं.. घरात एखादी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे नेणे हे महत्त्वाचे आहे आणि तातडीचेसुद्धा. याउलट बाजारातून आणलेली एखादी गोष्ट निवडून ठेवायची आहे, दरमहा येणारे वीजबिल ठरावीक मुदतीच्या आत भरायला हवे ही कामे महत्त्वाची असली तरी तातडीची नाहीत. ती लक्षात ठेवून त्या कालावधीत सोयीने करता येतात. चौथ्या प्रकारात मोडणाऱ्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील. मोबाईल, फेसबुक, इन्स्टा यावरचे तास न् तास चालणारे चॅटींग यामध्ये किती वेळ वाया जातो हे आपण सारेच जण पाहतो आहोत.

या माध्यमांचा आवश्यक तो उपयोग अवश्य करावा परंतु काही अनावश्यक गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळता यायला हव्यात. मुळातच आपल्याला नेमके काय करायचे आहे ते ठरवून कामाचे नियोजन केले तर वेळेचे नियोजन आपोआप होते. महत्त्वाच्या कामांची यादी करून ठेवता येते.

तसेच ‘प्लेस फॉर एव्हरिथिंग अँण्ड एव्हरिथिंग इन इट्स प्लेस’ हे साधे परंतु महत्त्वाचे तत्त्व पाळायची सवय जर लावून घेतली तर वेळ, शक्ती या दोन्ही गोष्टी वाया जात नाहीत.

काही वेळा व्यक्तीचा स्वभावही वेळेच्या नियोजनामध्ये अडथळा ठरू शकतो. काळजीखोर, रागीट, भिडस्त, अतिसंवेदनशील स्वभावही वेळेचे गणित बिघडवू शकतो. मनात नाराजी असेल तर आपल्या कामावरती परिणाम होऊ शकतो. समजा घरात काही वादविवाद झाला. बराच काळ मूड खराबच राहिला तर कामावर परिणाम होऊ शकतो. तेच काम करायला अधिक वेळ लागू शकतो. या किंवा यासारख्या अनेक गोष्टींमुळे वेळ वाया जाऊ शकतो. त्यासाठी ‘स्विच ऑन, स्विच ऑफ’ हे तंत्र आत्मसात करायला हवे. साक्षीभावाने विचार, भावना न्याहाळण्याचा सराव केल्यास या गोष्टी टाळता येऊ शकतात आणि वाया जाणारा वेळ वाचवून स्वत:ला योग्य कृतीकडे वळवणे, आवश्यक तिथे लक्ष देणे जमू शकते.आपल्या वेळेची विभागणी मुख्यत्वेकरून तीन भागात होत असते. पहिला भाग ड्युटी अवर्स, विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासाचे तास किंवा क्लासची वेळ असे म्हणता येईल. घरी बसून करायच्या कामाचाही यात अंतर्भाव करता येईल.

दुसरा भाग मेंटेनन्स टाईमचा. यात स्वत:च्या तसेच इतरांच्या, घराच्या देखभालीसाठी लागणाऱ्या वेळेचा अंतर्भाव असतो. जसे खाणे, झोपणे, साफसफाई, आवराआवर, इतरांसाठी खर्ची पडणारा वेळ असतो. तिसरा भाग ‘डिर्स्कीशनरी टाईम’ वरील सर्व आटपून उरलेला मोकळा वेळ जो फक्त स्वत:साठी असतो आणि तो आपल्याला हवा तसा आपण खर्च करू शकतो.

काही वेळा आपले लक्ष विचलित करणारे, कामात व्यत्यय आणणारे टाईम चीटर्सही भेटतात. उदा. उगीचच काही देण्याघेण्याचे निमित्त करून तास न् तास येऊन बसणारे मित्र मैत्रिणी, सहज म्हणून फोन करून तासभर काढणारे काही लोक. अशांना आपणच प्रयत्नपूर्वक आपल्याला आता वेळ नाही याची जाणीव करून द्यायला हवी. काही जणांच्या भिडस्त स्वभावामुळेही गोंधळ होतो. अनेकदा उगीचच हो ला हो म्हटले जाते आणि अनेक कामे अंगावर येऊन पडतात. त्यामुळे ठामपणाचे कौशल्य, सभ्य नकार देण्याचे तंत्र आत्मसात करून त्याचा अवलंबही केला पाहिजे. वेळेचे नियोजन करताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे वेळेचे नियोजन करणे म्हणजे स्वत:ला सतत कामात गुंतवून ठेवणे नव्हे, तर उपलब्ध वेळेत आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी कशा करता येतील ते ठरवणे. यामध्ये स्वत:साठी मोकळा वेळ काढण्याचाही समावेश होतो. ते करण्यासाठी उपलब्ध वेळेचा आणि ठरलेल्या कामांचा एकत्रितपणे विचार करायला हवा. सुऊवातीला म्हटल्याप्रमाणे तसे नियोजन आणि कामांची आखणीही करायला हवी. मूल्य निश्चिती, वेळेचे नियोजन, कामांची आखणी या गोष्टी व्यवस्थित केल्यास यशाचा टप्पा दूर नाही हे मात्र निश्चित!!

-अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.