Ajara accident| आजऱ्यात काळाचा घाला! जुन्या घराची भिंत कोसळून प्राध्यापिकेसह शाळकरी मुलीचा मृत्यू
आजऱ्यात ढिगाऱ्याखाली दबून दोघांनी गमावला जीव
आजरा - आजरा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वाणी गल्लीमध्ये सोमवारी (दि. २०) दुपारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. एका जुन्या घराची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आजरा महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि एका १२ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण आजरा शहरावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वाणी गल्ली येथील एका जुन्या घराची भिंत अचानक कोसळली. यावेळी ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी तुकाराम (उत्तम) भोसले (वय १२) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत वैष्णवीची आई ललिता तुकाराम भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने आजरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागरिकांची मोठी गर्दी
भिंत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने दोघींचा जीव वाचू शकला नाही. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच घटनास्थळी आणि रुग्णालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आजरा महाविद्यालयातील एका कर्तव्यदक्ष प्राध्यापिका आणि एका निष्पाप विद्यार्थिनीच्या अशा अपघाती निधनाने शिक्षण क्षेत्रातून आणि शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.