Sangli News | काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला; तासगावजवळ दुर्दैवी अपघात
तासगाव : कवठेएकंदच्या हद्दीत'लकी सिझन कोल्ड स्टोअर' समोर एक भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगात आलेल्या मारुती सुझुकी बलेनो कारने समोरून जाणाऱ्या टीव्हीएस एक्स एल लुना दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत
. काम आटोपून घरी परतत असतानाच काळाने घाला घातला. हा अपघात १० जून २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी १६ जून रोजी तासगाव पोलीसात गुन्हा दाखलकेला आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, रसुल मौला शेख (वय ७० वर्षे, रा. कवठेएकंद, ता. तासगाव) हे त्यांच्या पत्नी शहनाज रसुल शेख (वय ६० वर्षे) यांच्यासह लुनावरून तासगावहून कवठेएकंदच्या दिशेने आपल्या घरी परतत होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची दुचाकी लकी सिझन कोल्ड स्टोअरजवळ आली असता, मागून आलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या बलेनो कारने (क्रमांक-एम. एच. ०९-जी ए- ४३८३) त्यांच्या लुनाला पाठीमागून भीषण धडक दिली. कार चालक निष्काळजीपणे चालवत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या भीषण धडकेत रसुल मौला शेख यांच्या शरीराला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या पत्नी शहनाज शेख याही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कार चालक जखमींना कोणतीही मदत न करता अथवा पोलिसांना माहिती न देता, स्वतःच्या वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. काम आटोपून घरी परतत असताना काळाचा घाला रसूल शेख व त्यांच्या पत्नी कामानिमित्त तासगावला गेले होते काम आटोपून ते घरी परतत असतानाच काळाने हा घाला घातला. अपघाताचे वृत्त समजताच कवठेएकद परिसरात एकच शोककळा पसरलेली होती.