Kagal Accident News | कागलमध्ये काळाचा घाला! रेल्वे भरती परीक्षा देऊन परतणाऱ्या विवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू
सांगाव येथील ३० वर्षीय पल्लवी पाटील यांचा जागीच अंत
कागल -अज्ञात वाहनाने स्कूटरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मौजे सांगाव येथील ३० वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. पल्लवी राहूल पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. रेल्वे भरती परीक्षा देऊन परत येत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात तिचे वडील सतीश हेरुगडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास कागल येथील लक्ष्मी टेकडी परिसरात घडली. अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी पाटील ही कसबा बावडा येथे रेल्वे भरती परीक्षेसाठी गेली होती. परीक्षा संपल्यानंतर ती वडील सतीश हेरुगडे यांच्यासोबत स्कूटरवरून कागलकडे परत येत होती. लक्ष्मी टेकडी परिसरात आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले.
या अपघातात पल्लवी पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश हेरुगडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.घटना घडताच लक्ष्मी मंदिर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना कागल ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या चौकात हा अपघात घडला.
मृत पल्लवी पाटील या पती राहुल पाटील यांच्यासह गावात ऑनलाईन सेंटर चालवत होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कागल व सांगाव परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.या अपघाताची नोंद करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत कागल पोलिस ठाण्यात सुरू होते.