For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन:पुन्हा तेच ‘यांना तातडीने बांबोळीला न्या’!

06:45 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुन पुन्हा तेच ‘यांना तातडीने बांबोळीला न्या’
Advertisement

कोकणच्या निसर्गसौंदर्याची चर्चा जगभर होते, पण याच निसर्गरम्य पट्ट्यातील सामान्य माणूस आजही एका मूलभूत प्रश्नाशी झुंजतोय तो म्हणजे ‘आरोग्य’. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिह्यांत आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुऊ झाली आहेत. कागदावर पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ‘गंभीर ऊग्ण’ दिसला की, डॉक्टरांच्या तोंडून आजही एकच वाक्य बाहेर पडते, ‘यांना तातडीने बांबोळीला (गोवा मेडिकल कॉलेज) न्या!’ नुकत्याच पार पडलेल्या ‘आरोग्य जनता दरबारा’त स्थानिक जनतेने मांडलेल्या व्यथांनी हे अधोरेखित केले आहे की, कोकणची आरोग्य यंत्रणा स्वत:च सध्या ‘व्हेंटिलेटर’वर आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणे हा जिह्याच्या इतिहासातील मोठा टप्पा मानला गेला. अपेक्षा अशी होती की, आता उपचारांसाठी कोल्हापूर किंवा गोवा गाठावे लागणार नाही. मात्र, सध्या ही महाविद्यालये केवळ पदवी देणारी केंद्रे बनली आहेत की काय, असा प्रश्न पडतोय. सुपर स्पेशालिटी सुविधांचा अभाव आणि तज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे यामुळे ही ऊग्णालये केवळ ‘ट्रान्झिट हब’ ठरत आहेत.

सिंधुदुर्ग जिह्याच्या सीमेला लागून असलेल्या गोवा राज्याची आरोग्य सेवा सक्षम आहे. परंतु, महाराष्ट्रातील दोन मोठ्या जिह्यांचा भार गोव्यातील ‘बांबोळी’ ऊग्णालयावर पडत आहे. आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते. पण ऊग्णवाहिकेने गोवा गाठेपर्यंत अनेकांचा जीव वाटेतच जातो. जरी गोव्यात उपचार मोफत मिळत असले, तरी नेण्या-आणण्याचा खर्च आणि नातेवाईकांची होणारी ओढाताण गरीब ऊग्णांचे कंबरडे मोडणारीच असते.

Advertisement

आतापर्यंत मंत्री महोदयांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक जनता दरबार घेतले. पण विविध सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घेत पहिल्यांदाच सावंतवाडी येथे आरोग्याच्या प्रश्नावर ‘आरोग्य जनता दरबार’ भरवला. यातून आरोग्याच्या अनेक प्रश्नांनी कोकणातील आरोग्य सेवेचे पोस्टमॉर्टेम झाले. त्यामुळे कुठल्याही राज्यकर्त्यासाठी या आरोग्य जनता दरबारातून त्यांचा नाकर्तेपणा उघडा झालेला आहे.

आरोग्य जनता दरबारातील ‘पोस्टमॉर्टेम’ मुळे जनता दरबारात समोर आलेल्या तक्रारींनुसार, ग्रामीण ऊग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय आहे. कित्येक ठिकाणी रात्रपाळीला डॉक्टर उपलब्ध नसतात. कोट्यावधींची यंत्रसामग्री धूळ खात पडून आहे, कारण ती चालवण्यास तंत्रज्ञ नाहीत.

साध्या शस्त्रक्रियांसाठीही ऊग्णांना बाहेर पाठवण्याची मानसिकता यंत्रणेत घर करून बसली आहे. केवळ भव्य इमारती बांधून आरोग्य सेवा सुधारत नाही. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांना कोकणात थांबवण्यासाठी विशेष सवलती, आधुनिक शस्त्रक्रियांची सोय आणि जिल्हा ऊग्णालयांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. जोपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजमध्ये ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत, तोपर्यंत ‘रेफर टू गोवा’चा हा सिलसिला थांबणार नाही.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षे झाली. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा सुऊ होऊन डॉक्टरांची पहिली बॅच बाहेर पडली. तरी सुद्धा कोकणातील लोकांचे जिह्याबाहेर उपचारासाठी जाणे थांबलेले नाही. दोन्ही जिल्ह्यांत शासकीय आरोग्य यंत्रणा दुबळी आहे. त्यामुळे 80 टक्के उपचार खासगी दवाखान्यातूनच घ्यावे लागतात, हे आरोग्य जनता दरबारातून उघड झाले आहे. जोखमीच्या शस्त्रकियांसाठी आजही गोवा किंवा अन्य ठिकाणी रेफर केले जाते. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तज्ञ डॉक्टर नसतील, तर बाहेरून खासगी

डॉक्टर मानधन देऊन बोलवू शकतात, पण तीही तसदी घेतली जात नाही. सरळ ‘रेफर टू गोवा’ सुरू असते, हे कधी थांबणार हा प्रश्नचआहे. सामान्य माणसाच्या जीवाशी होणारा हा खेळ आता थांबायला हवा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील ऊग्णांना त्यांच्या हक्काचे उपचार त्यांच्याच जिल्ह्यात मिळणे, हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. जर यंत्रणा अशीच ‘व्हेंटिलेटर’वर राहिली, तर भविष्यात हा असंतोष अधिक तीव्र होईल, असा आरोग्य जनता दरबारातून जनतेने स्पष्ट इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे ती, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ‘रेफर’च्या पत्राऐवजी ‘उपचारांच्या हमी’वर लक्ष केंद्रित करावेत हिच!

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.