तिलारीचे पाणी शेतकऱ्यांच्या विकासासाठी
चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा विश्वास : विघ्नसंतोषींकडून अफवा पसरविण्याचा सपाटा
वार्ताहर/उचगाव
तिलारी परिसरातील जलाशयाचे पाणी लवकरच मार्कंडेय नदीमध्ये सोडून सीमाभागातील जनतेला, शेतकऱ्यांना याचा उपयोग करून देण्यात येणार आहे. शेतकरी महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील असो तो देशाचा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देशाची प्रगती होणार आहे. शेतकऱ्याला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळींकडून नको त्या अफवा पसरविण्याचा सपाटाच चालविला आहे. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही जातीने प्रयत्न करू, असे तुरमुरीतील समारंभप्रसंगी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी विचार व्यक्त केले. तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीपात्रात सोडण्यासंदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, संघटनेच्यावतीने तसेच माजी आमदार यांची नुकतीच एक संयुक्त बैठक घेण्यात आली. तिलारी धरणातील अतिरिक्त पाण्याचा जो साठा आहे, तो कसा मार्कंडेय नदीपर्यंत येईल आणि याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक कसा फायदा होईल, या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
तिलारी जलाशयाच्या खालील बाजूला भांडुरा, देवलनाला, पाळेपुरमार अशी तीन जलाशये केली जाणार आहेत. त्या माध्यमातून मार्कंडेय नदीमध्ये पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्रातील काही गावांबरोबरच बेळगाव तालुक्यातील विविध गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. याबरोबरच शहरालाही मोठा लाभ होणार असल्याचे यावेळी राजेश पाटील यांनी सांगितले. मात्र हे करत असताना राजकीय काही विघ्नसंतोषी लोकांना ही योजना आवडत नसल्याने आपण काहीतरी चांगले करत आहोत हे त्यांना खूपत असल्याने याच्यात काहीतरी खो घालण्याच्या उद्देशाने नको त्या अफवा पसरविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. मात्र त्यांच्या या अफवावर कोणीही विश्वास न ठेवता सीमाभागातील शेतकऱ्यांच्या आणि चंदगड पूर्व भागातील शेतकरी नागरिकांच्या उद्धारासाठी अधिकाधिक पाण्याचा साठा या मार्कंडेय नदीमध्ये कसा होईल, यासाठी कसोशीने प्रयत्न करून ही योजना पूर्णत्वाला नेऊ, असा ठोस आत्मविश्वास या कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी, शेतकऱ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात राजेश पाटील यांचे अभिनंदन केले.