टिळकवाडी, केआर शेट्टी, ब्ल्यू स्टार विजयी
तनिष्क चषक क्रिकेट स्पर्धा : ओमकार पाटील, अक्षय जगताप, प्रशांत बल्लूर, शुभम यादव यांना सामनावीर
बेळगाव : तनिष्क स्पोर्टस क्लब आयोजित तनिष्क चषक वरिष्ठ साखळी क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी अकादमीने वामिका व सिग्नेचर संघाचा, केआर शेट्टी किंगने यंग गण चॅम्पस, ब्ल्यू स्टार क्रिकेट क्लबने आर्णव क्रिकेट क्लबचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. ओमकार पाटील, अक्षय जगताप, प्रशांत बल्लूर, शुभम यादव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिनम ज्युबली मैदानावर आयोजित या पहिल्या सामन्यात वामिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 8 गडी बाद 180 धावा केल्या. त्यात रवी जयरामने 3 षटकांर 5 चौकारांसह 65, प्रवीण हिरेमठने 5 चौकारांसह 35, वासू लमानीने 4 चौकारासह 29 धावा केल्या.
टिळकवाडीतर्फे ओमकार पाटीलने 25 धावात 3, रोहित दोडवाडने 2 तर शिवलींग व कुणाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी अकादमीने 20 षटकात 3 गडी बाद 184 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात रवी पिल्लेने 3 षटकार 3 चौकारासह नाबाद 66, ओमकार पाटीलने 1 षटकार, 6 चौकारासह 47, शुभम यादवने 1 षटकार 4 चौकारासह 30 तर रोहित दोडवाडने 1 षटकार 2 चौकारासह 25 धावा केल्या. वामिकातर्फे अँडी, विकी सावंत व सुनील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात यंग गण चॅम्पसने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात सर्व गडीबाद 132 धावा केल्या.
त्यात अवनिशने 6 चौकारासह 34, तर समर्थ चौगुलेने 3 चौकारासह 23 धावा केल्या. केआर शेट्टी किंगतर्फे अक्षयने 33 धावात 4, किरण तारळेकर व राहुल शिंदे यांनी प्रत्येकी 2 तर शिवाजी पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केआर शेट्टी किंगने 18.5 षटकात 5 गडी बाद 133 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात प्रशांत लायंदरने 1 षटकार 7 चौकारासह 54, गुरुप्रसादने 3 चौकारासह 23 तर प्रणय शेट्टीने 3 चौकारासह 18 धावा केल्या. यंग गणतर्फे संदेश पवारने 2 तर प्रेम, समर्थ, युग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ब्ल्यू स्टार क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडी बाद 218 धावा केल्या. त्यात प्रशांत बैलूरने 11 चौकारसह 64, अक्षय भोगनने 3 षटकार 6 चौकारासह 61, अरिहंत अमनगीने 5 चौकारासह 29 तर नमन ओऊळकरने 22 धावा केल्या. आर्णवतर्फे भरत हुंदरने 16 धावात 4, संकेत पाटीलने 2 तर बसवंत व रघु यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्णव क्रिकेट क्लबचा डाव 22 षटकात 144 धावात आटोपला. त्यात शुभमने 4 चौकारासह 33, भरतने 22 तर विशालने 20 धावा केल्या. ब्ल्यू स्टारतर्फे लोहितने 28 धावात 4, प्रशांतने 3 तर करणने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 235 धावा केल्या. त्यात शिवम यादवने 3 षटकार 16 चौकारासह 100 धावा करून दमदार शतक झळकविले. त्याला रवी पिल्लेने 1 षटकार 5 चौकारासह 52 व शिवलिंगने 23 धावा करून सुरेख साथ दिली. सिग्नेचरतर्फे राहुल नाईकने 53 धावात 3, किसनने 2 तर रोहित व मनोज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर संघाने 25 षटकात 9 गडी बाद 176 धावा केल्या. त्यात राहुल नाईकने 3 षटकार 4 चौकारासह 47 तर अनुराग पाटीलने 5 चौकारासह 35 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे रोहित दोडवाड व ओमकार चव्हाण यांनी प्रत्येकी 2 तर विनायक कांबळेने 1 गडी बाद केला.