भारतीय संघाच्या कपाळावरील ‘तिलक’ !
नुकताच झालेला भारतीय संघाचा यशस्वी दक्षिण आफ्रिका दौरा खरा गाजविला तो तिलक वर्मानं...‘टी-20’ आंतरराष्ट्रीय लढतींत लागोपाठ शतकं नोंदविणारा तो ठरलाय भारताचा दुसरा, तर विश्वातील पाचवा खेळाडू...तिलक वर्मा व संजू सॅमसन यांनी शेवटच्या लढतीत दुसऱ्या यष्टीसाठी नाबाद 210 धावांची तुफानी भागीदारी रचली. भारतातर्फे एखाद्या ‘टी-20’ आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदविली गेलेली ही कुठल्याही यष्टीसाठीची सर्वोच्च भागीदारी. इतकंच नव्हे, तर एखाद्या आंतरराष्ट्रीय ‘टी-20’ लढतीनं 200 हून अधिक धावांच्या भागीदारीचं दर्शन घेण्याची ही पहिलीच खेप...
त्या 22 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजावर थोड्याशा दबावाला तोंड देण्याची पाळी आली...तसं पाहिल्यास चौथ्या क्रमांकावर येऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत नोंदविलेल्या 33 व 20 धावा म्हणजे फारशी वाईट कामगिरी मुळीच नव्हे...मग कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्याला त्याच्या आवडत्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला अन् बॅट चौफेर उधळली...
13 नोव्हेंबर...त्यानं सुपरस्पोर्ट पार्कवर 56 चेंडूंत आठ चौकार नि सात षटकारांच्या साहाय्यानं नाबाद 107 धावांचा पाऊस पाडला. भारताला मालिकेत 2-1 अशी आघाडी घेणं शक्य झालं...15 नोव्हेंबर...पाहायला मिळाला तो ‘रिप्ले’...यावेळी त्याच्या नाबाद 120 धावा जोहान्सबर्गवर अवतरल्या एखाद्या तुफानाच्या गतीनं. 47 चेंडूंच्या या खेळीत समावेश नऊ चौकारांचा नि मैदानाच्या बाहेर झेपावलेल्या 10 षटकारांचा. भारतानं मालिका 3-1 अशी खिशात घातली...त्याच्या भात्यात प्रत्येक फटका भरलाय आणि त्याचं दर्शन क्रिकेट जगताला लागोपाठ दोन वेळा झालंय...नाव...तिलक वर्मा...दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सरासरी चक्क 140...
सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार खात्यात जमा केलेला तिलक वर्मा म्हणाला, ‘सूर्यानं मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची वाट मोकळी करून दिली. मला तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर खेळणं अतिशय आवडतं. मंगळवारी रात्री सूर्या माझ्या खोलीत आला व त्यानं मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याची संधी मिळेल असं सांगितलं. मी देखील त्याला चांगली कामगिरी करून दाखविण्याचं आश्वासन दिलं’...शतक पूर्ण झाल्यानंतर तिलकनं बॅट सूर्यकुमार यादवला उंचावून दाखविली ती त्याचे आभार मानण्यासाठीच. आपले शब्द खरे करून दाखविल्याचा तो एक संदेशही...
यंदाच्या ‘प्रीमियर क्रिकेट लीग’मध्ये दुखापत झाल्यानंतर तिलक वर्माला तब्बल दोन महिने सराव करणं शक्य झालं नव्हतं आणि या गोंधळात झिम्बाब्वे नि श्रीलंकेविरुद्धच्या दोन आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका देखील चुकल्या. परंतु त्यानं संयम गमावला नाही अन् लक्षही भरकटणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर त्यानं आपला आत्मविश्वास परत मिळविलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये...त्याच्या सुदैवानं भारतीय संघाचं व्यवस्थापन हे खेळाडूंना साहाय्य करणारं, त्यांची उमेद वाढविणारं असल्यामुळं अन्य खेळाडूंप्रमाणं तिलकला सुद्धा त्याचा भरपूर लाभ मिळालाय...
भारतानं यंदा ‘टी-20’ विश्वचषक जिंकताना हा प्रकार खेळण्याची एक स्वतंत्र शैली विकसित केली....‘आम्हाला संघाकडून जोरदार पाठबळ मिळालंय आणि अपयशी ठरल्यावर देखील सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा संदेश देण्यात आलाय. भारत हा टी-20 मधील जगज्जेता असल्यानं गरज आहे ती त्याला शोभेलशी कामगिरी करून दाखविण्याची. आमच्यावर कुठलाही दबाव नाहीये. खेळाडूंना व्यवस्थापनानं सल्ला दिलाय तो लवकर बाद झाल्यावर सुद्धा चिंता न करण्याचा’, तिलक वर्माचे शब्द...
जोहान्सबर्ग येथील चौथ्या ‘टी-20’ सामन्यात तिलक फलंदाजीला आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमनं लगेच आणलं ते केशव महाराजाला. मार्करमच्या मनात कदाचित मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील यंदाच्या ‘आयपीएल’मधील सामना घोळत असावा. त्या सामन्यात अक्षर पटेलविऊद्ध तिलक वर्माला काही कमी संघर्ष करावा लागला नव्हता. पण यावेळी त्यानं त्या योजनेतील फोलपणा लगेच उघडा पाडताना केशवच्या चौथ्या नि पाचव्या चेंडूवर खेचले ते दोन उत्तुंग षटकार...
त्याचप्रमाणं वेगवान गोलंदाज एंडिले सिपाम्लानं तिलकच्या आवाक्याबाहेर चेंडू राहावा याकरिता ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करण्याच्या अन् खोलवर टप्पा ठेवण्याच्या धोरणाचा अवलंब केला होता. पण त्याचीही डाळ शिजू न देण्यासाठी या फलंदाजानं काय करावं ? तो यष्ट्यांच्या पलीकडे गेला, गुडघ्यावर बसला आणि 19 व्या षटकाचा शेवटचा चेंडू ‘स्विप’ करत स्क्वेअर लेगमधून सीमेच्या बाहेर रवाना केला...हे सर्व तीन फटके जितके जबरदस्त तितकेच फलंदाज म्हणून बदललेल्या, धावा काढण्यासाठी चाकोरीबाहेरच्या पद्धतींचा अवलंब करण्यास न कचरणाऱ्या तिलक वर्माचं दर्शन घडविणारे...
तिलक ‘आयपीएल’ गाजवू लागला होताच, पण गेल्या वर्षाच्या मध्यास वेस्ट इंडिजविऊद्ध अव्वल स्तरावर पाऊल ठेवल्यानंतर विशेषत: ‘टी-20’मध्ये आपल्या फलंदाजीला अधिक वैविध्यपूर्ण बनविण्याची गरज त्याला भेडसावू लागली. कदाचित ‘मुंबई इंडियन्स’मध्ये सूर्यकुमार यादवसोबत खेळताना त्याचे 360 डिग्री फटके पाहून त्याच्या मनात हा विचार डोकावला असावा !
- राजू प्रभू
हैदराबादच्या मैदानांतून मोठी झेप...
- मूळ बालापूरचा तिलक वर्मा क्रिकेटपटू म्हणून पायऱ्या झपाट्यानं चढत वर गेलाय...तो हैदराबादतर्फे देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारांत झळकलाय. 2020 साली 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत थडकलेल्या संघात अन् 2022 च्या हांगझाऊ येथील आशियाई खेळांत सुवर्णपदक पटकावणाऱ्या चमूत त्याचा समावेश राहिला होता...
- 2011 मध्ये तिलक हैदराबादच्या एका गल्लीत टेनिसबॉल क्रिकेट खेळताना त्याचे गुण हेरले ते ‘लिगाला क्रिकेट अकादमी’मध्ये धडे देणारे प्रशिक्षक सलाम बयाश यांनी. त्यावेळी तो 11 वर्षांचा...
- सलाम यांनी त्याला आपल्या अकादमीची दारं उघडी करून दिली. तथापि इतर कोणत्याही किशोरवयीन क्रिकेटपटूप्रमाणं तिलकनंही हा निर्णय पालकच घेऊ शकतात असं उत्तर दिलं. त्यानंतर त्याची प्रतिभा फुकट जाऊ नये यासाठी सलाम बयाश यांनी त्याला आपल्या हाती सोपवावं यासाठी पालकांचं मन वळविलं. त्याला वेगळ्या शाळेतही दाखल करायला लावलं...
- सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तिलक शालेय स्पर्धा आणि क्रिकेट क्लबमधून झळकू लागला. ही भागीदारी लवकरच कामी येऊन 2016 पर्यंत त्याला संधी मिळाली ती हैदराबादच्या 14 व 16 वर्षांखालील संघांचं प्रतिनिधीत्व करण्याची...
- 2018 नि 2019 साली त्यानं वरिष्ठ स्तरावरील क्रिकेट खेळण्याच्या दिशेनं आणखी काही भक्कम पावलं टाकली. कूचबिहार (19 वर्षांखालील) अन् सी. के. नायडू (23 वर्षांखालील) या स्पर्धांत केलेलं शानदार पुनरागमन या युवा खेळाडूला हैदराबादच्या वरिष्ठ संघात पोहोचवून गेलं...
हैदराबाद ते भारतीय संघ...व्हाया ‘आयपीएल’ !
- हैदराबादच्या वरिष्ठ संघात प्रवेश केल्यानंतर एका वर्षाच्या आत दक्षिण आफ्रिकेतील 2020 सालची 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा खेळण्याचं तिकीट तिलक वर्माच्या हाती पडलं. त्या विश्वचषकातील तीन डावांत त्यानं केल्या त्या अवघ्या 86 धावा. त्यातच इतर काही सहकाऱ्यांनी ‘आयपीएल’ करार पटकावण्यापर्यंत मजल मारली. या पार्श्वभूमीवर सलाम यांनी तिलकला जाणीव करून दिली ती खेळाचा स्तर आणखी उंचावण्याच्या गरजेची...
- तिलक वर्मानं देखील हा सल्ला वाया जाऊ न देता 2020-21 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत नोंद केली ती 36 च्या सरासरीची अन् 147 च्या ‘स्ट्राइक रेट’ची. त्यापूर्वी विजय हजारे चषक स्पर्धेत 97 च्या सरासरीनं धावा जमविताना झळकावली दोन शतकं...
- या मेहनतीचं फळ हातात पडलं ते फेब्रुवारी, 2022 मध्ये. तिलक वर्मानं ज्या संघातर्फे खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या ‘मुंबई इंडियन्स’नी त्याला 1.70 कोटी देऊन करारबद्ध केलं...हा निर्णय सार्थ ठरविताना त्यानं तेव्हापासून ‘आयपीएल’मध्ये सहा अर्धशतकांसह केवळ 38 सामन्यांतून 1156 धावा फटकावल्याहेत...यंदाच्या ‘इंडियन प्रीमियर लीग महालिलावा’पूर्वी मुंबईनं त्याला 4 कोटी रु. देऊन राखून ठेवणं पसंत केलंय ते उगाच नव्हे...
प्रशिक्षक सलाम बयाश सांगतात...
- तिलक वर्माच्या प्रगतीत त्याचे प्रशिक्षक सलाम बयाश यांचा हात फार मोठा...सलाम त्याला रोज 41 किलोमीटर्सचं अंतर पार करण्यास मदत करायचे ते त्यांच्या दुचाकीच्या साहाय्यानं. मग तिलकच्या कुटुंबानं निर्णय घेतला तो अकादमीच्या जवळ वास्तव्य करण्याचा. त्या सर्वांचा आनंद तिलक वर्मांनं पहिलं शतक झळकावल्यानंतर गगनात मावेनासा झाला...बयाश सांगतात, ‘तिलकला मी कधीच इतका आनंदित झालेला पाहिलेलं नाही. त्यानं भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री अडीच वाजता फोन करून पहिलं शतक नोंदविणं शक्य झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला’....
- ‘तिलक ‘रेड-बॉल’ क्रिकेटमध्ये सुद्धा खात्रीनं चांगली कामगिरी बजावेल. कारण तो पांढऱ्यापेक्षा तांबड्या चेंडूनं जास्त सराव करतोय. क्रिकेटच्या प्रत्येक ‘फॉर्मेटमध्ये तो चमकेल याची मला पूर्ण खात्री आहे. सध्या तो त्याची गोलंदाजी सुधारावी म्हणून सुद्धा फार प्रयत्न करतोय. जेव्हा डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळं दोन महिने घरी बसावं लागलं तेव्हा तो काहीसा तणावाखाली होता. पण त्यानं गोलंदाजी नि क्षेत्ररक्षण यांच्यावर लक्ष केंद्रीत करणं कधीही चुकविलं नाही’, सलाम बयाश सांगतात...
- राजू प्रभू