अमेरिकेत टिकटॉक बंद
अॅप स्टोअर्समधूनही हटविण्यात आले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक बंद झाले आहे. अमेरिकेत शनिवारी रात्री उशिरा टिकटॉक बंद झाले आहे. हे अॅपल आणि गुगल अॅप स्टोअर्समधूनही गायब झाले आहे. म्हणजेच अमेरिकेत आता या अॅपला डाउनलोड करता येणार नाही. नवा कायदा लागू होण्यापूर्वी हे घडले असून याच्या अंतर्गत सुमारे 17 कोटी अमेरिकन युजर्स असलेल हा अॅप बंद करणे आवश्यक ठरले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 90 दिवसांच्या मुदतीचे संकेत दिले आहेत. टिकटॉकने देखील ट्रम्प प्रशासनासोबत याविषयी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.
अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणारा एक कायदा लागू झाला आहे. याचा अर्थ युजर्सना आता टिकटॉक वापरता येणार नाही. परंतु नवे अध्यक्ष ट्रम्प यांनी टिकटॉक पुन्हा सुरू करण्यासाठी काम करणार असल्याचे संकेत दिले असल्याने आम्ही आनंदी आहोत, असे चिनी कंपनी बाइटडान्सची मालकी असलेल्या टिकटॉकने म्हटले अहे.
90 दिवसांची मुदत टिकटॉकला दिली जाण्याची शक्यता आहे. यासंबंधी मी सोमवारी घोषणा करू शकतो. टिकटॉकने मोठ्या संख्येत अमेरिकन युवांना आकर्षित केले आहे अमेरिकेतील सुमारे निम्मी लोकसंख्या या अॅपवर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
टिकटॉकवरील अमेरिकेच्या प्रशासनाने बंदी घातल्याने हे अॅप रविवारपासून बंद झाले आहे. मागील वर्षी संमत एका कायद्याच्या अंतर्गत टिकटॉकवर बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या बंदीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले आहे. टिकटॉकवर पुढील कारवाई करणे आता ट्रम्प प्रशासनावर निर्भर आहे. तर चिनी दुतावासाने अमेरिकेवर टिकटॉकवर बंदीसाठी अधिकारांचा गैरवापराचा आरोप केला आहे. टिकटॉकचे सीईओ शॉजी ज्यू हे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात सामील होऊ शकतात. चीनने टिकटॉकच्या अमेरिकेतील संचालनाला ट्रम्प यांचे सहकारी एलन मस्क यांना विकण्याविषयी चर्चा केली असल्याचे मानले जात आहे.