For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाभिलच्या डोंगरात वाघिणीचा झालेला मृत्यू संशयास्पद

04:55 PM Mar 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दाभिलच्या डोंगरात वाघिणीचा झालेला मृत्यू संशयास्पद
Advertisement

मनसेचा दावा ; सखोल चौकशी करण्याची उपवनसंरक्षकांकडे मागणी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील दाभिलच्या डोंगरातील वाघिणीचा मृत्यू हा संशयास्पद असून याची सखोल चौकशी करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडे केली . यावेळी श्री. रेड्डी म्हणाले की सदर वाघिणीच्या मृतदेहाची जेव्हा आम्हाला घटना समजली त्यावेळी त्या ठिकाणी गेलो असता ती वाघीण एकदम कुजलेल्या अवस्थेत होती. तिच्या शरीरावर असणारे पट्टे अक्षरशः दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही यासंदर्भात तिचे रिपोर्ट दिल्ली येथील लॅबमध्ये पाठवलेले आहेत. असे यावेळी श्री रेड्डी यांनी सांगितले. परंतु, यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी सदरचा भाग सह्याद्रीपट्टा व्याघ्र कॉरिडॉर जाहीर करा अशी मागणी केली व या जिल्ह्यात असणारे पट्टेरी वाघ यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आहे असे सांगितलं. त्यामुळे ठीक ठिकाणी ट्रॅपिंग कॅमेरे लावण्यात यावे व या पट्टेरी वाघांचं संरक्षण करावे अशी मागणी केली. यावेळी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांनी सांगितलं की तत्कालीन उपवनसंरक्षक शहाजी नारनवर होते. त्यावेळी सन २०२२ मध्ये व्याघ्र गणना करत असताना पट्टेरी वाघांची दखल घ्यावी असे निवेदन दिले होते.आत्ता रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे आठ पट्टेरी वाघ आहेत. असं असताना जिल्ह्यात यांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा व तसे राज्य सरकार व केंद्र सरकारला कळवा. त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये माकड, गवे यांनी अक्षरशः शेती बागायती नारळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे . परंतु पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते . त्यामुळे या वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपण गांभीर्याने लक्ष द्यावे असे आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांनी सांगितले. यावेळी उत्तर देताना श्री रेड्डी म्हणाले की वनविभागाने काही माकडे पकडलेली आहेत माकडे ही दोन प्रजातीची असून आमच्या वन अधिकाऱ्यांनी याबाबत ज्या ज्या ठिकाणी हे वन्य प्राणी उपद्रव करत आहेत त्याच्या ठिकाणी आमची रेस्क्यू टीम काम करीत आहे. पकडलेल्या माकडांना राधानगरी जंगलामध्ये सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या परीने योग्य ते प्रयत्न करत आहोत तसेच ज्या वन्य प्राण्यांना खाद्य लागतं अशी वनस्पती झाडे आपले जे राखीव वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी लावण्यात यावी व पानवटे तयार करावे जेणेकरून हे वन्यप्राणी बाग, बागायतीचे नुकसान करणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर व शुभम नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.