कोल्हापूर दक्षिणमध्ये चुरशीने मतदान
सर्वत्र शांततेत मतदान : सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर गर्दी: मतदान बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांचा दिवसभर राबता
कोल्हापूर
अतिसंवेदनशील असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात चुरशीने मतदान प्रक्रीया पार पडली. दोन ठिकाणी इव्हीएम मशिन बंद पडल्याने काहीकाळ उडालेला गोंधळ वगळात सर्वत्र शांततेत मतदान झाले. दिवसभर महाडिक-पाटील गटाच्या कार्यकत्dर्यांनी मतदान बाहेर काढण्यासाठी दिवसभर राबता घेतला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असणारा आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गट कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात थेट आमने-सामने येतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मतदार संघाकडे आहे. येथे काँग्रेस व भाजपचा उमेदवार असला तरी पाटील विरुद्ध महाडिक गट अशीच हि निवडणुक होते. दोन्ही बाजूला कट्टर कार्यकर्ते असल्याने या मतदार संघात नेहमीच राजकीय वातवरण तापलेले असते. मात्र यंदा कुठेही वादावादी न होता सर्वत्र शांततेत मतदान झाले. उपनगरसह ग्रामीण भागात सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांची गर्दी होवू लागली होती. एकंदरीत वातावरण पाहता मतदारांमध्ये मोठया उत्साह दिसून आले. स्वयुस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडत होते.
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची व्यवस्था केली होती. यामध्ये रिक्षा, टेम्पो, यासह चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना आणणे व सोडण्याची व्यवस्था पद्धतशिरपणे करण्यात आली होती.
हायटेक मतदान केंद्रे,कोल्हापूरच्या संस्कृतीचा प्रचार
दक्षिण विधानसभा मतदार संघात काही ठिकाणी हायटेक अशी मतदान केंद्र केली होती. जमिनीवर कारपेट, कारपेटच्या दोन्ही बाजूला वृक्षांच्या कुंड्या, मतदारांसाठी बैठक व्यवस्था अशा पद्धतीने मतदान केंद्रांची आकर्षक सजावट केली होती. तर काही ठिकाणी कोल्हापुर गुळ, गुऱ्हाळ घर, लघु उद्योगांचे डिजिटल फलक उभारत कोल्हापूरी संस्कृतीचाही प्रचार केला.
मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी
लोकसभा मतदानाच्यावेळी मतदारांनी कोणाला मतदान केले याचे व्हिडीओ चित्रीकरण मोबाईल केल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. यानंतर कोल्हापूर जिह्यातील 20 जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावेळीही पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घातली होती. मोबाईल तपासूनच मतदारांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जात होता.
मतदानाचे व्हिडीओ थेट सोशल मिडीयावर
पोलीस प्रशासनाकडून मोबाईलला बंदी केली असतानाही काही उत्साही समर्थक मोबाईल घेवून मात्र तरीही काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करुन त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. याचे सायबर विभागाकडून तपासणी सुरु असून या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.