For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात चुरशीने मतदान

10:59 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव दक्षिण मतदारसंघात चुरशीने मतदान
Advertisement

मतदारांना घरापासून मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड : किरकोळ घटना वगळता सुरळीत

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात मंगळवारी चुरशीने मतदान झाले. म. ए. समिती, काँग्रेस व भाजप यांनी या भागात ताकदीने प्रचार केल्याने चुरस वाढली होती. यामुळे मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मतदारांना घरापासून मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. विशेषत: अनगोळ, टिळकवाडी, उद्यमबाग, मजगाव, भाग्यनगर येथे मतदानासाठीचा उत्साह दिसून आला. चुरशीने मतदान झाल्याने बाजी कोण मारणार? याची चर्चा सर्वत्र सुरू होती. टिळकवाडी परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मतदानासाठी गर्दी होती. परंतु त्यानंतर धिम्यागतीने टिळकवाडी, नानावाडी, चन्नम्मानगर परिसरात मतदान प्रक्रिया सुरू होती. व्हॅक्सिन डेपो येथे सरकारी मराठी शाळा क्र. 36 च्या परिसरात मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. बऱ्याच नागरिकांना आपले मतदान केंद्र कोठे आहे, याची माहिती नसल्याने धांदल उडाली. या परिसरात लायन्स भवन, टिळकवाडी येथील स्काऊट अॅण्ड गाईड कार्यालय, गोडसेवाडी, चन्नम्मानगर, कावेरीनगर-भवानीनगर, शानभाग स्कूल येथे धिम्यागतीने मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

अनगोळमध्ये मतदानाची चुरस

Advertisement

शहराच्या इतर भागापेक्षा अनगोळ परिसरात मतदानासाठी चुरस दिसून आली. म. ए. समिती, काँग्रेस, तसेच भाजपचे पदाधिकारी मतदान केंद्र परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक मतदाराला घरापासून मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी रिक्षांची व्यवस्था केली होती. अनगोळमध्ये शाळा क्र. 6, संत मीरा शाळा, उर्दू स्कूल, तसेच केएलई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चुरशीने मतदान झाले. मजगाव येथे शाळेच्या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही मजगावच्या सर्वच केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला. दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली. उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी शाळेच्या आवारातच रांग लावण्यात आली होती.

दुपारच्यावेळेत शुकशुकाट

सकाळच्या सत्रात मतदानाला चांगली सुरुवात झाली. परंतु दुपारी 1 नंतर रखरखत्या उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील चन्नम्मानगर, अनगोळ, मजगाव यांसह इतर मतदान केंद्रांवर गर्दी ओसरली होती. राजहंस गल्ली, अनगोळ येथील उर्दू शाळेत दुपारी 1 च्या सुमारास पूर्णपणे शुकशुकाट होता. दुपारपर्यंत या केंद्रावर 450 मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

पिंक बुथद्वारे महिलांमध्ये जागृती

महिलांमधील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने निवडक मतदान केंद्रांवर पिंक बुथ तयार केले होते. विशेषत: टिळकवाडीतील नानावाडी व गजानन महाराजनगर येथील मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुलाबी रंगाचे फुगे, तसेच फुलांच्या माळा लावून मतदान केंद्र सजविण्यात आले होते. मतदानासाठी येणाऱ्या महिलांना याठिकाणी सेल्फी पॉईंट उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच युवकांमध्ये मतदानाची जागृती व्हावी यासाठी यलो बुथ तयार करण्यात आले होते. अनगोळ येथील शाळा क्र. 6 मध्ये युवकांसाठी बुथ आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.

होसूर येथील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड...

मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात होताच होसूर येथील 217 बुथवरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. 15 ते 20 मिनिटे सेन्सर बंद असल्याने मतदान यंत्र बंद झाले. काही वेळानंतर सेन्सर योग्यरित्या काम करू लागल्याने मशीन पुन्हा सुरू झाली. यामुळे 217 नंबर बुथवरील मतदान काहीवेळासाठी थांबविण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मशीन बदलण्याबाबत निर्णय झाला. परंतु त्यापूर्वीच मशीन सुरू झाल्याने त्याच मशीनवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तीन महिन्यांच्या तान्हुल्यासह माता मतदान केंद्रावर दाखल

मतदानाच्या हक्कामुळे देशाचे नेतृत्व ठरविण्याची जबाबदारी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे हा हक्क बजावण्यासाठी तीन महिन्यांच्या तान्हुल्यासह दाम्पत्य मतदान केंद्रावर उपस्थित होते. पापामळा येथील सोनम मिनजगे व त्यांचे पती टिळकवाडी गजानन महाराजनगर येथील मतदान केंद्रावर उपस्थित होते. लहान मुलाला घेऊन आल्याने इतर नागरिकांनीही त्यांना रांगेत उभे न ठेवता मतदानासाठी वाट मोकळी करून दिली.

Advertisement
Tags :

.