भारत-बांगलादेश सीमेवर कडेकोट सुरक्षा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतात येत्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या गणतंत्रदिनानिमित्त भारत आणि बांगला देश यांच्या सीमेवर कडोकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाने या सीमेवरील आपल्या सैनिक तुकड्यांना ‘ऑप्स अलर्ट’ दिला असून कोणतीही अवांछनीय घटना होऊ नये, म्हणून पूर्ण दक्षता घेतली जात आहे. या सीमेवर गस्त वाढविण्यात आली असून सर्व प्रवेशद्वारे बंद राहणार आहेत. भारत आणि बांगला देश यांच्यात पश्चिम बंगालपासून मेघालय पर्यंत 4 हजार 6 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. या संपूर्ण सीमारेषेवर दक्षता बाळगण्यात येत आहे. सैनिकांच्या तुकड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गणतंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व विभागातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी सीमाक्षेत्राची पाहणी केली आहे. कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण सीमा सुरक्षित असून चिंतेचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सीमेवर अनेक स्थानी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिक तुकड्यांनी संचलनही केले आहे. यावेळी भारत आणि बांगला देश यांच्यातील सीमारेषेवर परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे आवश्यक ती सर्व दक्षता पुरेशा प्रमाणात घेतली गेली आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय अधिकारी रवि गांधी यांनी केले. त्यांनी स्वत: सीमा क्षेत्राचा दौरा करुन पाहणी केली आहे.
राजकीय महत्व
काही महिन्यांपूर्वी बांगला देशात गृहयुद्ध भडकले होते. शेख हसीना यांच्या काही संघटनांच्या बंडाळीमुळे देश सोडावा लागला होता. त्यानंतर त्या देशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंच्या विरोधात हिंसाचार करण्यात आला. आजही तो होत आहे. त्यामुळे त्या देशातील हिंदूंचे जीवन असुरक्षित बनले आहे. अशा परिस्थितीत सीमेवर भक्कम सुरक्षा ठेवण्याची आवश्यकता असून सीमा सुरक्षा दल ही परिस्थिती योग्यरित्या हाताळत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
केंद्र सरकारचे लक्ष
केंद्र सरकारच्या गृहविभागाने सीमेवरील घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने सीमेवरील उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. बांगला देशात उद्भवलेल्या परिस्थितीचा दुरुपयोग करुन काही धर्मांध शक्तींकडून भारतात संकट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या सर्व शक्यता गृहित धरुन सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे.