Satara News : साताऱ्यात जिल्हा परिषद सभापती निवडीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त
जिल्हा परिषदेला पोलिस छावणीचे स्वरूप
सातारा : जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून जिल्हा परिषद परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद परिसराच्या १०० मीटर परिघात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून ये-जा पूर्णपणे नियंत्रित करण्यात आली आहे. तसेच सातारा–कोरेगाव मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला असून वाहतूक सदर बाजार मार्गे वळवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने २०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) एक तुकडीही साताऱ्यात दाखल झाली असून तीही बंदोबस्तात सहभागी आहे.
सभापती निवडीच्या प्रक्रियेदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.