खेर्डी पंचायत समिती गणात चुरशीची लढत; उमेश खताते विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक
खेर्डी गणात राजकीय प्रतिष्ठेची लढाई
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेर्डी पंचायत समिती गणात यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहे. अशातच ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमेश खताते यांनी खेर्डीवासियांच्यादृष्टीने महत्वाचा असलेला या भागाचा विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभाराचा मुद्दा थेट केंद्रस्थानी आणला आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि युवक - महिला सक्षमीकरणासाठी ठोस कृती आराखडा तयार असल्याचा दावा करत खताते यांनी आपल्या प्रचारात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
खेर्डी पंचायत समिती गणातील निवडणूक लढत आता केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता थेट राजकीय प्रतिष्ठेचा सामना बनली आहे. ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेश खताते यांची उमेदवारी जाहीर होताच या गणातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, मातब्बरांच्या बालेकिल्ल्याला धक्का देणारा युवा चेहरा अशी चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्य, संघटन कौशल्य आणि थेट जनतेशी संवाद हे खताते यांचे बलस्थान मानले जात आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे खताते यांची उमेदवारी खेर्डीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधवही खतातेंसाठी मैदानात उतरणार असून त्यांच्या दोन जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे.
खेर्डी परिसरात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार व युवकांचे प्रश्न यावर सातत्याने आवाज उठवणारे उमेश खताते हे सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत. 'सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची' या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. खेर्डी गण कोणाचा बालेकिल्ला नाही, तो जनतेचा आहे. विकासासाठी संघर्ष करणारा प्रतिनिधीच पंचायत समितीत हवा, असा थेट संदेश देत त्यांनी मतदारांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली आहे. एकीकडे अनुभवी आणि प्रस्थापित नेते, तर दुसरीकडे परिवर्तनाचा नारा देणारा युवा उमेदवार या संघर्षामुळे खेर्डी पंचायत समिती गणातील निवडणूक तालुक्यातील सर्वाधिक चुरशीची लढत ठरण्याची चिन्हे आहेत.