For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रात वाघ सहाशेपार

06:30 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रात वाघ सहाशेपार
Advertisement

अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्र राज्यातल्या जंगलात पट्टेरी वाघांची संख्या सहाशेपार होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. 2022च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रातल्या जंगलात 444 वाघांची नोंद झाली होती. त्यानंतर केवळ चार वर्षांनंतर होणाऱ्या व्याघ्र गणनेच्या प्राथमिक अंदाजानुसार ही संख्या सहाशेपार होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मागच्या व्याघ्र गणनेच्या तुलनेत पट्टेरी वाघांच्या संख्येत यंदाच्या गणनेत भरीव वाढ होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. व्याघ्र गणनेतील चढत्या क्रमांकांची ही आकडेवारी उत्साहवर्धक असली तरी परिसरातील मानव आणि पट्टेरी वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला जाऊन महाराष्ट्रात परिसरातील माणसे आणि वाघांचे जे लक्षणीय बळी गेलेले आहेत आणि सध्या त्यात सुधारणा होण्याऐsवजी संघर्ष चालू आहे, ही सुद्धा निश्चितच गंभीर चिंतेची बाब बनलेली आहे.

Advertisement

त्यामुळे वाघांची वाढती संख्या ही, व्याघ्र संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आजतागायत जी सकारात्मक पावले शासकीय पातळीवर घेण्यात आली, त्याचाच हा चांगला परिणाम आहे परंतु जोपर्यंत वन्यजीव व परिसरातल्या मानवी समाजात सौहार्दाचे आणि समन्वयाचे संबंध प्रस्थापित होऊन समतोल राखला जात नाही, तोपर्यंत एका बाजूला वाघांची संख्या वाढत जाईल तसेच दुसऱ्या बाजूला वाघ आणि मानव यांचे एकमेकांमार्फत बळी जाण्याचे प्रमाण वाढत राहील तर तो चिंतेचाच विषय बनेल. बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या व्याघ्र राखीव क्षेत्रांत वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या वाढत्या संख्येनुसार जंगलात अन्न-पाण्याची व्यवस्था हवी, त्यात तुटवडा निर्माण होत असल्याने, हे वाघ परिसरातल्या गुरांढोरांवर हल्ले करून, त्यांचेच बळी घेऊन, त्यांच्याच मांसावर गुजराण करीत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे व्याघ्र राखीव क्षेत्र, अभयारण्ये तसेच राष्ट्रीय उद्याने आणि जंगले येथे वावरणारे वाघ पाळीव जनावरांवर हल्ले करून, त्यांचा फडशा पाडत असल्याचे आणि परिसरातल्या स्थानिकांशी त्यांचा संघर्ष वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

मेळघाटमध्ये 2022 मध्ये 50 ते 60 एवढी वाघांची संख्या होती. या व्याघ्र गणनेत ही संख्या 90 ते 100 पर्यंत होण्याचा अंदाज आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सुमारे 70, नवेगाव-नागझिऱ्यात व्याघ्र राखीव क्षेत्रात 20 ते 25 वाघांची नोंद झालेली आहे. उमरेड कऱ्हाड अभयारण्यात तसेच परिसरातल्या सरकारी जंगलात पूर्वी सहा वाघांची नोंद होती. ती 17 ते 18 पर्यंत वाढली आहे. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्रात तर वाघांची संख्या स्थिर राहिलेली म्हणजे 40 ते 45 आहे. बोर व्याघ्र क्षेत्रात आठ-दहा तर भंडारा-गोंदियात ही संख्या पंधरा आहे. राधानगरी सह्याद्री परिसरात नऊ तर कोल्हापूर ते कालीपर्यंतच्या पट्ट्यात वाघांची संख्या पंधरा आणि पांढरकवडा टीपेश्वर परिसरात 35 आणि मुक्ताई भवाई पट्ट्यात पाच ते सहा तर ताडोबा अंधेरी व्याघ्र राखीव क्षेत्रात, राज्यातील सर्वाधिक म्हणजे शंभर वाघ असल्याचा अंदाज आहे.

Advertisement

व्याघ्र गणनेच्या प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातील समस्त व्याघ्र राखीव क्षेत्र, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि सरकारी मालकीच्या जंगलात सध्या असलेल्या वाघांची संख्या गृहीत धरली तर हा आकडा यंदाच्या व्याघ्र गणनेच्या अंतिम अहवालावेळी सहाशेच्यावर जाणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. व्याघ्र गणनेनुसार वाघांची वाढणारी संख्या, हे महाराष्ट्र राज्य व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद आहे परंतु असे असले तरी वाढत्या वाघांच्या संख्येला पोषक असा नैसर्गिक अधिवास आणि आवश्यक खाद्यान्नाची रसद इथे उपलब्ध आहे का? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

महाराष्ट्रातली वाघांची संख्या वाढल्याने, त्यांच्यासाठी उपलब्ध नैसर्गिक अधिवास अपुरा ठरणार असून, त्यामुळे नर, प्रौढ वाघांचा प्रादेशिक वर्चस्वासाठी संघर्ष विलक्षणरित्या वाढण्याची चिन्हे आहेत. बऱ्याच ठिकाणी वाघांची संख्या जरी वृद्धिंगत झालेली असली तरी त्या तुलनेत मात्र तेथील तृणहारी मृग आणि अन्य वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली नसल्याने, इथले वाघ परिसरातल्या गुरांढोरांवर हल्ले करून, स्थानिक शेतकऱ्यांकडे त्यांचा संघर्ष वाढल्याचे स्पष्ट झालेले आहे. आपल्या पाळीव जनावरांवर वारंवार वाघ हल्ला करून, त्यांचा बळी घेत असल्याने, चिडलेले शेतकरी वाघावर विषप्रयोग करून, त्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. 2026 च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालखंडात येथील जंगलात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 23 लोकांचे बळी गेलेले असून, त्यातील सर्वाधिक मृत्यु हे वाघांच्या हल्ल्यात उद्भवलेले आहेत. 22 मे रोजी सिंदेवाहीच्या गुंजेवाहीच्या जंगलात तेंदु पत्ते गोळा करण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी वाघांच्या हल्ल्यात झाल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे वाघ आणि मानव यांच्यातला चंद्रपूर जिह्यातील संघर्ष किती विकोपाला गेलेला आहे, हे स्पष्ट झालेले आहे.

गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिह्यात मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलेला असून, त्यात दोनशेच्यावर स्थानिकांचे बळी वाघांच्या हल्ल्यांत गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. येथील स्थानिक जंगल निवासी जाती-जमाती तेंदु पत्ते त्याचप्रमाणे जंगलातील मध आणि अन्य गरजेच्या बाबी आणण्यासाठी जात असल्याचे दिसून आलेले आहे. स्थानिक लोकांबरोबर लोह खनिज उत्खनन आणि तत्सम व्यवसायांनी वाघ व वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास संकटाच्या खाईत वारंवार लोटलेला आहे. त्यामुळे वाघ-मानव यांच्यातला संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून आले आहे.

2026च्या व्याघ्र गणनेचा अंतिम अहवाल जरी उशिरा जाहीर होणार असला तरी प्राथमिक अंदाजानुसार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट झालेले असल्याने, महाराष्ट्र वन खात्याने व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या क्षेत्रांबरोबर अन्य जंगल क्षेत्रातील त्यांचा नैसर्गिक अधिवास कसा अतिक्रमणविरहित आणि सुरक्षित राहील तसेच त्यांना तेथे आवश्यक अन्न-पाणी कसे प्राधान्यक्रमाने उपलब्ध होईल, या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. वाघ-मानव यांच्यात समन्वय, सौहार्द आणि समतोल कसा राखला जाईल, यावरती दोन्ही घटकांचे अस्तित्व टिकून राहील आणि एकमेकांसाठी अनुरुप होईल.

राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.