Sangli News : भाजप अंतर्गत तिकीट संघर्षाचा उद्रेक; दीपक माने पत्नीसह आमदार कार्यालयात ठिय्या
सांगली महापालि का निवडणुकीत भाजपात उमेदवारीवरून तीव्र संघर्ष
सांगली : सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता अधिक उग्र वळण मिळालं आहे. तिकीट वाटपावरून भाजपात प्रचंड रस्सीखेच सुरू असून उमेदवार ठरवताना नेत्यांच्या नाकी नऊ आले आहेत.
प्रभाग क्रमांक 11 या ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव जागेवर भाजपाचे आक्रमक कार्यकर्ते दीपक माने यांच्या पत्नी प्रतिभा माने इच्छुक होत्या. मात्र उमेदवारी त्यांना नाकारून नवख्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं. या निर्णयाने संतप्त झालेल्या दीपक माने यांनी पत्नीसमवेत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं.
आमदार गाडगीळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर माने दांपत्याने कार्यालयातच जमिनीवर ठिय्या मांडला. उमेदवारी डावलल्याच्या भावनेने दीपक माने इतके भावनाविवश झाले की त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. या प्रसंगी उपस्थित भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
सांगली भाजपात उमेदवारीवरून असा टोकाचा संघर्ष उफाळून आल्याने निवडणुकीच्या वातावरणात अधिक गोंधळ निर्माण झाला आहे.