ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकणे धोक्याचे
कचऱ्याला आग लावल्याने ट्रान्स्फॉर्मर पेट घेण्याची शक्यता
बेळगाव : हेस्कॉमकडून वारंवार सूचना करून देखील शहरात अनेक ठिकाणी विजेच्या ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकला जात आहे. ओल्या कचऱ्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान होत आहे. तसेच काही ठिकाणी सुक्या कचऱ्याला आग लावली जात असल्याने ट्रान्स्फॉर्मर जळण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकणे हे धोक्याचे ठरू लागले आहे. ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा जाळला जात असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. काही वर्षांपूर्वी टिळकवाडी परिसरात भूमिगत वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले होते. असेच प्रकार आता सर्वत्र सुरू आहेत. मनपाकडून घरोघरी जाऊन कचरा जमा केला जात असतानाही गल्लीच्या कोपऱ्यावर अथवा अडगळीच्या ठिकाणी कचरा फेकला जात आहे.
भूमिगत वीजवाहिन्यांचे मेठे नुकसान
शिळे अन्नपदार्थ तसेच इतर ओला कचरा ट्रान्स्फॉर्मरच्या खाली टाकला जात आहे. शहरात सर्वत्र भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. या वीजवाहिन्यांचे ओल्या कचऱ्यामुळे नुकसान होत आहे. ओल्या कचऱ्यामुळे या वीजवाहिन्या सडल्या जात असल्याने त्या निकामी होत आहेत. तसेच सुक्या कचऱ्याला आग लावल्यानेही वीजवाहिन्यांचे नुकसान होत आहे. ट्रान्स्फॉर्मरने पेट घेतल्यास आजूबाजूच्या घरांनाही मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर खाली कचरा टाकणे बंद करावे, असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.