योगीकुळात जन्मलेला योगी योगाभ्यासाच्या बळावर वेदांना उल्लंघून जातो
योगाभ्यास अपूर्ण राहिला असताना जर साधकाला मरण आले तर त्याने केलेल्या योगाभ्यासामुळे तो त्याला हवा तेव्हढा काळ स्वर्गात राहू शकतो. तेथील भोगांचा कंटाळा आल्यावर राहिलेला योगाभ्यास पूर्ण करण्यासाठी त्याच्या इच्छेनुसार त्याचा कुलीन आणि श्रीमंत घराण्यात किंवा योगी कुळात जन्म होतो. कुलीन, श्रीमंत घराण्यात जन्म घेतल्यानंतर त्याच्या अपुऱ्या इच्छा तृप्त होतात. त्यानंतर तो मागील जन्मी जेव्हढा योगाभ्यास झाला असेल त्याच्या पुढील अभ्यास करू लागतो.
योगीकुळात जन्म झाला असेल तर लहानपणापासूनच त्याचा योगाभ्यास पुढे सुरु होतो. ह्या अर्थाचा
तिथे तो पूर्व-जन्मीचा बुद्धि-संस्कार जोडुनी । मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ।। 43 ।। हा श्लोक आपण पहात आहोत.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, योगीकुळात ज्याचा जन्म होतो त्याच्या ठिकाणी अल्पवयातच स्वरूपज्ञानाचा उदय होतो. लहानपणीच त्याला सर्वज्ञता माळ घालते. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रs आपोआप त्याच्या मुखातून निघतात. योगीकुळात जन्म मिळावा ह्या इच्छेने देव स्वर्गात नेहेमी जप, होम इत्यादिक करत असतात.
योगी कुळात जन्म होण्याचे महात्म्य विशद करताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, योगमार्गाचा अवलंब करण्यास जरी तो समर्थ नसला तरी पूर्वजन्माचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो. त्यामुळे वेदरहस्याचे गूढ उलगडते आणि समाधीचा अनुभवही त्याला सहज साध्य होतो.
पूर्वाभ्यास-बळाने तो खेचला पर-तंत्र चि । जिज्ञासेने हि योगाच्या जातो वेदांस लंघुनी ।। 44 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, योगाभ्यास करणाऱ्याला मागील जन्माच्या शेवटी जी चांगली बुद्धी प्राप्त झालेली असते तीच ह्या जन्मी त्याला सतत प्राप्त होत असते. भाग्यवान पायाळू माणसाच्या डोळ्यात दिव्यांजन मिळाल्यानंतर, त्याला पाताळातील द्रव्य सहज दिसते त्याप्रमाणे योगशास्त्रातील जे सिद्धांत बुद्धीच्या आवाक्यात नसतात किंवा जे केवळ गुरूकडून कळावयाचे असतात, ते सिद्धांत त्याला सहज समजतात. बलवान इंद्रिये मनाच्या स्वाधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायु अनायासे मूर्ध्निआकाशास मिळू लागतो. हे सगळे आपोआप कसे होते. अभ्यास व समाधी त्याला शोधत येतात.
हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील भैरवदेव आहे असे वाटते. हा पुरुष म्हणजे अष्टांगयोगाची सामुग्री दाखवणारा जणू दिवाच होय. तो जणू काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा अशा तयारीचा साधकदशेतच वाटतो. असे वाटण्याचे कारण म्हणजे हजारो जन्मांचे अडथळे ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहचलेला असतो. सर्व साधने आपोआप त्याच्यामागे येतात. त्यामुळे तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. त्याच्या मनात येणारे विचार विवेकपूर्णच असल्याने त्याला विवेकबुद्धीची गरज भासत नसल्याने तीही नाहीशी होते.
क्रमश: