काम, क्रोध, मोह, दंभ ही चार नरकद्वारे
अध्याय दहावा
राजस व तामसी भक्त स्वत:चा उद्धार व्हावा या दृष्टीने कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत. देहसुख मिळवणे हे राजस लोकांचे ध्येय असते. नरकात मिळणाऱ्या दु:खांना भिऊन हे लोक अधर्माचरण करत नाहीत पण यांना सत्ता व संपत्तीची फार हाव असते. अशा स्वभावामुळे त्यांची जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. हवे ते मिळवण्यासाठी, काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असते. फार महत्वाकांक्षी असल्याने, यशाची व यशाच्यामागून येणाऱ्या मानाची त्याला फार ओढ असते. राजस भक्त हा संपत्तीचा पुजारी असतो. संपत्तीचा साठा करण्याकडे त्यांचा कल असतो. दुसऱ्या प्रकारचे राजस लोक राक्षस म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची उपासना करत असतात. शक्ती, अधिकार आणि त्यातून येणारी राक्षस वृत्ती ही द्योतक होय.
तामसी स्वभावाचे भक्त वेदांना मान्य नसलेले, क्रूर, अहंकारयुक्त व दंभयुक्त कर्मे करतात. ते प्रेत-भूते इत्यादिकांची भक्ति करतात. कामुक कर्म करतात. स्वत:चा देह व देहामध्ये स्थित असलेल्या ईश्वराला त्रास देतात. दृढ आग्रहाने युक्त असतात. तामसी लोक फक्त पृथ्वीवरील सुखाचीच अपेक्षा करतात ते परलोकाचा विचार सुद्धा करत नाहीत. हे उतावळ्या आणि भडक स्वभावाचे असतात. वेदशास्त्रामध्ये काहीही आधार नसलेली कर्मे ते आपण करतोय तेच बरोबर अशा दांभिक वृत्तीने रेटून नेत असतात. यांच्या वासना भयंकर असतात. त्या अपूर्ण राहिल्याने मृत्यूनंतर ते भूतयोनीत राहतात. तामसी लोक शारीरिक कष्ट म्हणजे तप समजतात. त्यामुळे ते शरीराला नाना प्रकारे छळत असतात. या त्यांच्या वर्तनाला कोणताही शास्त्राधार नसतो.
सात्विक, राजस आणि तामस भक्तांचे व ते करत असलेल्या भक्तीचे वर्णन करून झाल्यावर या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात काम, क्रोध, मोह आणि दंभ ही चार नरकद्वारे आहेत असे बाप्पा सांगतात.
कामो लोभस्तथा क्रोधो दम्भश्चत्वार इत्यमी । महाद्वाराणि वीचीनां तस्मादेतांस्तु वर्जयेत् 23
अर्थ-काम, लोभ, क्रोध आणि दंभ हे चार नरकांचे मोठे दरवाजे आहेत. म्हणून यांना वर्ज्य कर. विवरण-सात्विक भक्ती करणारे लोक आहेत त्यात समाधानी असतात. पण राजस आणि तामसी लोकांना सतत काही ना काही इच्छा होत असतात. त्यातल्या ज्या पूर्ण होण्यासारख्या असतात त्या पूर्ण करण्याचा त्याला मोह होऊ लागतो. एकदा पूर्ण झाल्यावर त्या पुन: पुन्हा पूर्ण व्हाव्यात असा लोभ त्याला सुटतो. त्या पुन: पुन्हा पूर्ण होण्याच्या आड जो येईल त्याचा त्याला क्रोध येऊ लागतो. ज्यांचा राग येतो. त्यापैकी काही माणसावर तो सहजी राग व्यक्त करू शकतो. पण काही लोकांच्या हातात त्याच्या नाड्या असल्याने त्याला गप्प बसावे लागते. अशावेळी तो खोटे गोड बोलून त्यांनी आपले म्हणणे मान्य करावे म्हणून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो. त्याने केलेला हा खोटेपणा, मनात एक व ओठात एक असे बोलणे, जे नाही ते आहे असे दाखवणे. या गोष्टी दांभिकपणा या सदरात मोडतात. थोडक्मयात मनुष्याच्या इच्छा त्याला मोह, लोभ, क्रोध, दंभ इत्यादी महाद्वारांनी नरकात प्रवेश मिळवून देतात म्हणून माणसाने आहे त्यात समाधानी रहावे. जे मिळेल ते गोड मानून घ्यावे. त्यासाठी आपण कर्ते नसल्याने सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत हे कायम लक्षात ठेवावे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, ईश्वर आपला कर्ता करविता आहे. याची जाणीव राहण्यासाठी सतत त्याचे स्मरण करावे. त्याच्या स्मरणात राहिल्याने दुष्कृत्ये करायला आपले हात धजावणार नाहीत. त्यामुळे आपण करत असलेले प्रत्येक कर्म हे सत्कृत्य या सदरातच मोडेल.
श्रीगणेशगीता अध्याय दहावा समाप्त.