गांधीगिरीद्वारे बसचालकाला गुलाबपुष्प देऊन बस थांबविण्याची विनंती
अनेकवेळा निवेदने देऊनही परिवहनचे दुर्लक्ष
वार्ताहर /सांबरा
मुतगे येथील बसथांब्यावर बसेस थांबत नसल्याने विद्यार्थीवर्गाचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी गांधीगिरी करत बसचालकाला गुलाबपुष्प देऊन दररोज बस थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे गांधीगिरी मार्गाने केलेल्या या आंदोलनाची पूर्वभागांमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती. मुतगे येथील बसथांब्यावर बस थांबत नसल्याने बस थांबविण्यासाठी यापूर्वी अनेक निवेदनेही देण्यात आली आहेत व आंदोलनेही झाली. मात्र याचा काहीही परिणाम न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने बसचालक व वाहकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी बसचालक व वाहकाला गुलाबपुष्प देऊन बसथांब्यावर बसेस थांबवण्याची विनंती करण्यात आली. सध्या मोफत बससेवेमुळे महिलावर्गाची बसेसमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे अनेकवेळा बसचालक बसथांब्यावरील गर्दी पाहून बसेस न थांबवताच पुढे निघून जात आहेत. याचा फटका मात्र विद्यार्थी वर्गाला बसत आहे. यासाठी एक तर गावाला स्वतंत्र बस सोडावी किंवा पंत बाळेकुंद्री, सुळेभावी भागातून येणाऱ्या सर्व बसेसना येथील बसथांब्यावर बस थांबवण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. बसचालकांना गुलाबपुष्प देताना ग्रा. पं. माजी अध्यक्ष किरण पाटील, भालचंद्र पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्ष श्याम मुतगेकर, सदस्य संजय पाटील, पीडीओ बसवंत कडेमणीसह प्रमोद इंगळे, राजू मल्लवगोळसह ग्रामस्थ व शाळकरी मुले उपस्थित होते.