Kolhapur : कागल यात्रेत थरार ! 90 फूट उंच पाळण्यात 18 जण अडकले !
कोल्हापूर अग्निशमन जवानांचे साडेतीन तास अथक परिश्रम
कागल : कागल येथील गहिनीनाथ उरसानिमित्त भरलेल्या यात्रेतील ऊंच पाळण्यामध्ये शुक्रवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. सुमारे ८० ते ९० फूट उंचीवर पाळण्यामध्ये १८ नागरिक अडकले. या नागरिकांची कोल्हापूर अग्निशमन विभागाकडील टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने सुखरुप सुटका करण्यात आली. यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे साडेतीन तास अथक परिश्रम घेतले.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कागल येथील उरसामध्ये उंच पाळण्यात तांत्रिक बिघाड झाला असून सुमारे ८० ते ९० फूट ऊंचीवर १८ नागरिक अडकल्याची वर्दी मिळाली. वर्दी मिळताच अग्निशमनचे स्टेशन ऑफीसर ओंकार खेडकर, चालक अमोल शिंदे, भगवान शिंगाडे, फायरम अभय कोळी, प्रमोद मोरे टर्न टेबल लॅडर घेवून तत्काळ कागलला रवाना झाले.
घटानस्थळी पोहचताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी कागल अग्निशमन दलाचे माळी, रणजीत साठे, नितेश कांबळे यांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात केली. एक एक करत सर्व पाळण्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरुप खाली उतरवले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत बचाव कार्य सुरु होते. बचाव कार्याचा हा थरार सुमारे साडेतीन तास सुरु होता.