Ratnagiri News | स्वत:वरच सुऱ्याने वार! दुसऱ्याला अडकवण्यासाठी रचलेला 'तो' भयानक कट दापोलीत उघड
दापोलीत अनधिकृत घुसखोरी;
दापोली : तालुक्यातील जालगावबर्वेआळी येथे जागेच्या वादातून मनोहर भिकाजी यादव (७६) यांना ठार मारण्याची धमकी देऊन स्वतःवरच सुऱ्याने वार करून घेणाऱ्या महेंद्र सीताराम पवार या इसमाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर यादव हे आपल्या जुन्या घराची दुरुस्ती करत असताना संशयितआरोपी महेंद्र पवार याने त्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश केला.
फिर्यादी यांनी आरोपीला घुसखोरी न करण्याबाबत आणि तेथून निघून जाण्याबाबत सांगितले असता, आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. काही वेळानंतर आरोपी हातात सुरा घेऊन पुन्हा त्याठिकाणी आला आणि फिर्यादीकडे पैशांची मागणी करू लागला.पैसे न दिल्यास मी स्वतःला सुरा मारून घेईन आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देऊन आरोपीने हातातील सुरा हवेत निष्काळजीपणे फिरवून स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले. फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जागेत अनधिकृतपणे घुसखोरी केली व न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून दापोली पोलीस ठाण्यात फिर्याददाखल करण्यात आली आहे
याप्रकरणी मनोहर यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी महेंद्र पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ (अ), ३२९(३), ३५१ (२) आणि ३५२ नुसार नोंद केला आहे. स्वतःला जखमी करून दुसऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून जागेत घुसखोरी केल्याप्रकरणी दापोली पोलीस नाईक राजेंद्र नलावडे अधिक तपास करत आहेत.