कराडमध्ये ‘बर्निंग बाईक’चा थरार
कराड :
शहरातील कृष्णा नाका परिसरात मंगळवारी भरदुपारी ‘बर्निंग बाईक’चा थरार पाहावयास मिळाला. चालू स्थितीत असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने दुचाकीस्वार प्रसंगावधान राखून वेळेवर दूर झाल्याने जीवितहानी टळली. मात्र, दुचाकी संपूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
रोहित मधुकर सुतार (वय 33, रा. गजानन हाऊसिंग सोसायटी, हजारमाची, कराड) हे कामानिमित्त शहरात येत असताना कृष्णा नाक्याजवळ त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या वायरिंगमधून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि तातडीने सुरक्षित अंतरावर गेले.
क्षणार्धात दुचाकीने पेट घेतला आणि ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता इतकी होती की काही मिनिटांत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. रस्त्यावरच पेट घेतलेल्या वाहनामुळे कृष्णा नाका परिसरातील चारही दिशांची वाहतूक काही काळ ठप्प झाली.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीचा भडका एवढा प्रचंड होता की दुचाकीचा सांगाडाच उरला होता. दरम्यान, कराड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णत: जळून खाक झाली.
या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण स्पष्ट होणे बाकी आहे. इलेक्ट्रिक दुचाकींमधील तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.