Bahadurwadi | बहादूरवाडीत थरार! घरजागेच्या वादातून सुरक्षा रक्षकावर चाकूने खुनी हल्ला
घरजागेचा वाद विकोपाला, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
आष्टा : बहादूरवाडी येथे घरजागेच्या कारणावरून झालेल्या वादात एका सुरक्षा रक्षकावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या हल्ल्यात संग्राम जयसिंग पवार (वय ३५, रा. बहादूरवाडी हरिजन वस्ती) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात विजय नानासो पवार (रा. बहादूरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम पवार हे मंगळवारी (दि. ३१ मार्च) रात्री ११ वाजेच्या सुमारास गावातील 'युवा बॉईज चौक' येथे उभे होते. यावेळी त्यांचा मामाचा मुलगा अशोक गणेश जाधव आणि आरोपी विजय पवार हे दोघे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. संग्राम पवार हे अशोक जाधव यांच्याशी रागाने बोलत असताना, आरोपी विजय पवार याने जुन्या घरजागेच्या वादाचा राग मनात धरून संग्राम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला आरोपीने संग्राम यांच्या कानशिलात लगावून हातानेमारहाण केली. त्यानंतर तो तातडीने घरात गेला आणि चाकू घेऊन बाहेर आला. त्याने संग्राम यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. संग्राम यांनी पहिला वार चुकवला, मात्र त्यानंतर आरोपीने त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला चाकूने गंभीर वार केला. या हल्ल्यात संग्राम रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमी संग्राम पवार यांना तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, गुन्हा नोंदवला आहे.