For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Yashwantpur Bikaner Express Robbery | सोलापूर हादरलं! यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, प्रवाशांना मारहाण करत लाखोंची लुटमार

09:59 AM Jul 12, 2026 IST | NEETA POTDAR
yashwantpur bikaner express robbery   सोलापूर हादरलं  यशवंतपूर बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ  प्रवाशांना मारहाण करत लाखोंची लुटमार
Advertisement

सोलापूर: सोलापूर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी घुसून महिलांसह प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११) पहाटे घडली. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement

दरम्यान, गाडी क्रमांक १६५८७ यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस शनिवारी पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत तब्बल ७४ मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती. याच संधीचा फायदा घेत चार ते सहा जणांच्या टोळीने एस-४, एस-६ आणि एस-७ या डब्यांमध्ये प्रवेश केला. काही आरोपींनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांचे साहित्य हिसकावले, तर काहींनी थेट डब्यात प्रवेश करून महिलांच्या गळ्यातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.

या घटनेत एस-७ डब्यामधून प्रवास करणारे सोलापूरचे महेश गोपाळ पवार (वय ३४, रा. पूर्व मंगळवार पेठ) यांच्या पत्नीच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सुमारे १ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली. याशिवाय इतर तीन प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि अन्य साहित्यही चोरट्यांनी लुटले.

Advertisement

Advertisement
Tags :

.