नंदगड भागात पावसामुळे मळणी हंगाम धोक्यात
वार्ताहर /नंदगड
सर्वत्र सुगीचा हंगाम सुरू असून शेतकरी वर्ग भात कापणीत व्यस्त आहेत. बुधवारी पहाटे अचानकपणे आलेल्या पावसामुळे कापलेले भातपीक पाण्याखाली गेले. असाच पाऊस सुरू राहिल्यास शेतकरी वर्गाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. खानापूर तालुक्यात सर्वत्र भात पिकविले जाते. सर्वच गावातील शेतवडीत भातपीक कापण्याचे काम सुरू आहे. शेतकरी वर्ग व शेतमजूर भात कापणीच्या कामात व्यस्त आहेत. माळरानावरील व पाणथळ जमिनीतील भातपीक कापण्यासाठी आले आहे. कापणी जोरात सुरू आहे. असे असताना बुधवारी सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत पाऊस पडला. यामुळे कापलेले भातपीक पाण्याखाली गेले. त्यातच दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून आहे.
ऊस तोडणीत व्यत्यय
खानापूर तालुक्मयातील उसाला उतारा चांगला म्हणून विविध साखर कारखान्यांनी येथील उसाची उचल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ऊसतोड कामगार वाहने दाखल झाली आहेत. आठवड्यापासून कारखान्याला ऊस जात आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान दोन दिवस तरी ऊस तोडणी स्थगित ठेवावी लागणार आहे.
गुंजी परिसराला दमदार पावसाने झोडपले
बुधवारी सकाळपासून गुंजी परिसरास जोरदार पावसाने झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे कापणी केलेल्या भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी 7 वाजता प्रारंभ झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरू होता. विजेच्या गडगडाटासह संततधार पाऊस पडल्याने शिवारात पाणी तुंबले. त्यामुळे कापणी केलेले भातपीक पाण्याखाली गेले. सकाळी अचानक पावसास सुऊवात झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची धांदल उडाली. अर्धवट असलेल्या मळण्या भातगंज्या झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. तरीही शेतावर जाण्यापूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या मळणी व भातगंज्या पावसात भिजल्या. गेल्या आठवड्यापासून या परिसरात भात कापणीस सुऊवात करण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कापणी केलेले भातपीक तसेच अनेकांच्या अर्धवट भातगंज्या व मळण्या या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
जंगली प्राण्यांचा सुळसुळाट
सध्या या भागात जंगली प्राण्यांचा सुळसुळाट सुरू असून जंगली प्राणी भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान करीत आहेत. प्राण्यांच्या उपद्रवाला वैतागल्यामुळे उरलेसुरले भातपीक पदरात पाडून घेण्यासाठी येथील शेतकरी ढगाळ वातावरणाची तमा न बाळगता भात कापणीसाठी धडपडत होता. आता मध्यम भागातील असलेली पिकेही जंगली प्राणी दिवसेंदिवस खाऊन फस्त करीत आहेत.