For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

12:23 PM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
Advertisement

बैलहोंगल तालुक्यात मरकुंबी येथे साखर कारखान्यात बॉयलर स्फोट : गरम मळीने भाजले कामगार

Advertisement

बेळगाव : साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अन्य पाचजण जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी येथे असलेल्या साखर कारखान्यात ही घटना घडली असून जखमींवर बेळगाव येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. बॉयलर स्फोटानंतर गरम मळी अंगावर पडून ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एव्हीसीपी क्रमांक एकच्या व्हॉल्वचे दुरुस्ती काम सुरू असताना ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अक्षय चोपडे (वय 45) राहणार जमखंडी, सुदर्शन बनोशी (वय 25) राहणार चिक्कमुनवळ्ळी, ता. खानापूर व दीपक मुनवळ्ळी (वय 31) राहणार नेसरगी अशी मृतांची नावे आहेत. जखमींना झिरो ट्रॅफिकमधून बेळगाव जिल्हा व शहर पोलिसांच्या मदतीने इस्पितळात हलविण्यात आले.

पाच जखमींवर उपचार सुरू

Advertisement

भरत बसाप्पा सारवाडी (वय 27) राहणार गोडचिनमलकी, राघवेंद्र गिरीयाल (वय 35) राहणार गोकाक, मंजू तेरदाळ (वय 35) राहणार अथणी, मंजू काजगार (वय 28) राहणार अरवळ्ळी, गुरु तम्मण्णावर (वय 28) राहणार मरेगुद्दी, जि. बागलकोट अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे 40 फूट उंच असलेल्या एव्हीसीपी क्रमांक एकमधील व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यासाठी ते बंद करण्यात आले होते. दुरुस्ती सुरू असतानाच अचानक गरम मळी कामगारांच्या अंगावर पडली. त्यामुळे याकामी गुंतलेले तब्बल आठ कामगार होरपळून गेले. जिवाच्या आकांताने त्यांनी एकच आरडाओरड सुरू केला. गरम मळी अंगावर पडल्यामुळे त्यांची त्वचा सोलून निघाली होती.

‘झिरो ट्रॅफिक’मधून जखमी इस्पितळात 

घटनेची माहिती समजताच मुरगोडचे पोलीस निरीक्षक आय. एम. मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेसंबंधी पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन म्हणाले, गरम मळी अंगावर पडून ही घटना घडली आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. झिरो ट्रॅफिकमधून जखमींना इस्पितळात हलविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.