Solapur Robbery शस्त्राच्या धाकाने दागिन्यांची लूट भरदिवसा ‘ज्वेलर्स’मधून 5 लाखांचे नेकलेस लंपास घटना सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी सोलापूर
शहरातील 70 फूट रोडवरील गजबजलेल्या सराफ बाजार परिसरात शनिवारी भरदिवसा पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. तीन अज्ञात तरुणांनी शिवकुमार ज्वेलर्स या दुकानात घुसून पिस्तूलू व रॉडचा धाक दाखवत 4 लाख 94 हजार रुपयांचे दोन सोन्याचे नेकलेस लंपास केले. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दुकानमालक खुर्शीद आलम शेख (वय 40, रा. भारतरत्न इंदिरा नगर, 70 फूट रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार, खुर्शीद शेख यांचे घर आणि दुकान एकाच इमारतीत असून तळमजल्यावर ‘शिवकुमार ज्वेलर्स’ हे दुकान आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे दुकान सुरू असताना दुपारी सुमारे 12.35 वाजता ग्रे रंगाच्या स्कूटरवरून तीन संशयित तऊण दुकानासमोर आले.
यातील दोघे दुकानात घुसले, तर एकजण बाहेर थांबला होता. दुकानात आलेल्या एका आरोपीच्या हातात लोखंडी रॉड होता, तर दुसऱ्याने पिस्तूलसदृश वस्तू रोखून धमकावले. संशय आल्याने खुर्शीद शेख यांनी मागील दरवाजातून बाहेर पडत आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी दुकानातून बाहेर आले आणि पिस्तूल दाखवून परिसरातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपींनी आणलेली ग्रे रंगाची अॅक्सेस स्कूटर (एमएच 45-9951) घटनास्थळीच सोडून दिली आणि 70 फूट चौकाच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींनी शोकेसमधून दोन सोन्याचे नेकलेस चोरल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक ढवळे हे करीत आहेत.
चोरीस गेलेल्या दागिन्यांचा तपशील
दागिना वजन किंमत
सोन्याचे नेकलेस 18 ग्रॅम 2,34,000
सोन्याचे नेकलेस 20 ग्रॅम 2,60,000
एकूण 38 ग्रॅम 4,94,000
सीसीटीव्हीत कैद आरोपी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींच्या हालचाली स्पष्ट दिसत आहेत. एका आरोपीने काळा मास्क, ग्रे रंगाची टोपी, काळा शर्ट व पँट परिधान केली होती. दुसऱ्याने चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधून काळ्या रंगाची हुडी घातली होती. तिसरा आरोपी तपकिरी-पांढऱ्या चौकडीच्या शर्टमध्ये असून त्याचा चेहरा उघडा असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
पोलिसांची नाकाबंदी, तपास वेगात
घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी सोडून दिलेली स्कूटर आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून शहरभर नाकाबंदी करण्यात आली आहे.
व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
गर्दीच्या सराफ बाजार परिसरात भरदिवसा झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सराफ व्यावसायिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, बाजारपेठांमध्ये सुरक्षा उपाय अधिक बळकट करावेत आणि आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.