वारगाव येथे तीन हजारांचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कार्यवाही : एकावर गुन्हा दाखल
कणकवली / वार्ताहर
वारगाव - रोडेवाडी येथील घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ११२ ग्रॅम वजनाचा ३ हजार २०० रु. किमतीचा गांजा सदृश्य अमंली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार आशिष जामदार यांच्या फिर्यादीवरून प्रवीण उर्फ बबन आत्माराम गुरव (५५, रा. वारगाव रोडेवाडी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही १ जुलै रोजी रात्री १०.२७ वा. च्या सुमारास करण्यात आली.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला वारगाव येथे गांजा सदृश्य अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक मोहन दहिकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रामचंद्र शेळके, हवालदार सदानंद राणे, डोमणिक डिसोजा, किरण देसाई, बस्त्याब डिसोझा, बिल्सन डिसोझा, जॅक्सन घोणसालबीस, आशिष जामदार, महिला पालीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांचे पथक वारंगाव येथे रवाना झाले.त्यानंतर तेथे पोलीस पथकाने सापळा रचून प्रवीण उर्फ बबन गुरव याच्या घरावर छापा टाकला. बबन गुरव याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी याच्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला ११२ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. बबन गुरव याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ठेवलेला गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर प्रवीण गुरव याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमसंहिता १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक महेश शेडगे करत आहेत.