For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कायद्याचे तीन तेरा

06:43 AM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
कायद्याचे तीन तेरा
Advertisement

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये तऊणीवर झालेल्या अत्याचाराने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसते. चार महिन्यांपूर्वी शहरापासून काहीशा आडबाजूला असलेल्या बोपदेव घाटात एका युवतीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुण्यातील सर्वांत गजबजलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेटमध्येही याचीच पुनरावृत्ती झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेसह एकूणच महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचे लक्षात येते. स्वारगेट एसटी स्थानक हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणासह अन्य भागांत जाणाऱ्या गाड्या याच स्थानकावर लागतात. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची कायम वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी पडून असलेल्या शिवशाही बसमध्ये असा प्रकार घडावा, हीच मुळात परिवहन आणि गृह विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारी बाब ठरावी. एकेकाळी महाराष्ट्र सरकारची एसटी सेवा राज्यभर प्रसिद्ध होती. लालपरी, हिरकणी यांसारख्या गाड्यांनी तर एसटीच्या इतिहासात नवा मापदंड निर्माण केला. या गाड्यांनंतर अनेक आकर्षक गाड्या आल्या. महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशीच नावेही त्यांना दिली गेली. परंतु, या बससेवा सुरू करताना जो उत्साह दिसला, तो प्रवास सुरू झाल्यावर दिसला नाही. शिवशाही हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. 2017 रोजी युती सरकारच्या काळात या बससेवेची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुंदर लूक आणि परवडणारे भाडे यामुळे ही गाडी अल्पावधीत लोकप्र्रि्रय झाली. तथापि, अल्पावधीतच या गाडीचे खरे रूप समोर आले. बस घाटातच बंद पडणे, इंजिन गरम होणे आणि अपघात होणे, ही नित्याची गोष्ट होऊन बसली. गोंदियातील अपघातात 11 जणांना जीव गमवावा लागला. तर त्यानंतरच्या कितीतरी अपघातात शेकडो माणसे मृत्युमुखी पडली. गाडीची सदोष रचना ही अपघातास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मुख्य म्हणजे बाह्यात: आकर्षक वाटणारी ही बस चालक, वाहक आणि प्रवासी अशा सर्वांनाच कालांतराने तापदायक वाटू लागली. त्यातून प्रवासीसंख्येत घट झाली. अगदी बस बंद करण्याच्या चर्चाही पसरल्या. मात्र, एसटी प्रशासनाकडून त्या फेटाळण्यात आला. आधी शिवशाहीच्या ताफ्यात काही खासगी बसेसचाही समावेश होता. मात्र, तोट्यात गेल्यानंतर या बसेस खासगी कंपन्यांनी काढून घेतल्या. तेव्हापासून कशीबशी रडतखडत या बसची वाटचाल सुरू असल्याचे दिसते. ज्या बसमध्ये अत्याचाराची घटना घडली, ती बस तर अनेक दिवसांपासून बंदच होती म्हणे. मुख्य म्हणजे ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी या बसवर धडक मारल्यानंतर आतमध्ये निरोध, महिलांचे कपडे यांसह अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचे आढळून आले. हे बघता एसटीचा कारभार किती भोंगळ पद्धतीने चालतो, याची प्रचिती येते. शिवाय आपल्या विभागाची पडीक बस गुन्हेगारांचा अ•ा बनते, हेच एसटी प्रशासनाला समजत नसेल, तर ते कुठल्या काळात वावरतायत, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. दुसऱ्या बाजूला स्वारगेट स्थानकात मद्यपी, खासगी एजंट आणि तृतीयपंथियांनी उच्छाद मांडला असल्याचे पत्र एसटी प्रशासनाने स्वारगेट पोलिसांना चारच दिवसांपूर्वी दिल्याची माहितीही पुढे आली आहे. हे पत्र उशिरा मिळाल्याचे पोलीस सांगत असले, तरी आधीही पत्रव्यवहार केल्याचा एसटीने केलेला दावा बघता पोलिसांचा हलगर्जीपणा झाला, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. इतके होऊनही गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम हे खासगी सुरक्षारक्षकांकडे बोट दाखवतात आणि पोलिसांची पाठराखण करतात, हा कळसच म्हटला पाहिजे. गुन्हा घडताना किंवा घडल्यावर पीडित तऊणीने विरोध केला नाही. त्यामुळे गुन्हा उशिरा उघडकीस आल्याचे त्यांनी तोडलेले तारे म्हणजे असंवेदशीलपणाचा नमुनाच होय. दोन दिवसांनंतर नराधम दत्तात्रेय गाडे याला शिरूरमधील त्याच्या गावातून पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी लोकेशन सापडूनही त्याने ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला पळायला लावले, ते काही भूषणावह ठरू नये. आरोपी गाडे याने गावातील उसाच्या फडात आश्रय घेणे, त्यानंतर तहानेने व्याकूळ झाल्यावर नातेवाईकाकडे पाणी पिण्यास येणे, नातेवाईकांकडून ही खबर गावकऱ्यांकडे जाणे, गावकऱ्यांकडून पोलिसांना याची टीप दिली जाणे आणि कालव्याच्या ख•dयातून अखेर गाडेला बाहेर काढून अटक होणे, हे सगळे थरारनाट्याच म्हटले पाहिजे. तथापि, गावकऱ्यांनी आम्हीच गाडे याला पकडून दिले, पोलिसांनी नव्हे, असा दावा केल्याने पोलिसांना या विलंबित अटकेचे श्रेय मिळणेही अवघड असेल. अटकेनंतर गाडे याने मी पाप केले. मात्र, जे झाले, ते सहमतीने, असा दावा केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी ही शक्यता फेटाळलेली दिसते. या पार्श्वभूमीवर तपासातून आणखी कोणत्या गोष्टी पुढे येतात, हे पहावे लागेल. मुळात गाडे याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे. हे बघता त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का किंवा कसे, याचा शोध घ्यावा लागेल. अधिक तपासातून निश्चितपणे त्यावर प्रकाश पडू शकतो. मागच्या काही दिवसांपासून पुण्यासह एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे दिसते. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्यातील कोयता गँगचा उच्छाद, महिलांवरील अत्याचार यांसह विविध घटनांमधून त्याचेच दर्शन घडते. पूर्वी महाराष्ट्र हे सर्वच दृष्टीने शांत आणि सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जायचे. पण, मागच्या काही वर्षांत हा लौकिक इतिहासजमा होऊ लागला आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल बिहारसारख्या राज्याच्या दिशेने तर सुरू नाही ना, अशी शंकाही मनात आल्याशिवाय राहत नाही. या शंकाकुशंका दूर करण्यासाठी राज्य सरकारला ठोस पावले उचलावी लागतील. त्यासाठी गृह विभागाने कठोरात कठोर भूमिका घेऊन गुन्हेगारांचा बंदोबस्त केला पाहिजे.

Advertisement

Advertisement
Tags :

.