भारतीय मोहिमेचे तीन तेरा !
ऑस्ट्रेलियाचा दौरा हा यापूर्वीही भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीला पूर्णविराम लावण्यासाठी कुविख्यात राहिलेला...अन् यंदा आपल्याला ज्या प्रकारे शक्य असूनही वर्चस्व गाजविता आलं नाही तसंच ज्या पद्धतीनं संघानं लोळण घेतली ते पाहता त्याची पुन्हा एकदा साक्ष आल्यास नवल नव्हे...केवळ कर्णधार म्हणून नव्हे, तर फलंदाज या नात्यानंही संघातील स्थान गमावण्याची तलवार लटकू लागलीय ती रोहित शर्माच्या डोक्यावर. त्याच्यासारखीच परिस्थिती झालीय ती टीकेचा धनी बनलेल्या विराट कोहलीची...इतकंच नव्हे, तर खुद्द प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरलाही या पराभवानं निसरड्या रस्त्यावर आणून उभं केलंय...
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील, गेल्या 100 वर्षांतील फक्त 7 हजार 664 चेंडू टाकण्यात आलेली मालिका अखेर संपलीय ती भारताच्या 1-3 पराभवानं...विशेष म्हणजे कांगारुंच्या देशातील क्रिकेटवेड्यांनीही सर्वांत जास्त गर्दी केली ती याच सिरीजमध्ये...ती गाजली अनुभवी भारतीय फलंदाजांनी केलेल्या अपेक्षाभंगामुळं, त्यांच्या प्रचंड अपयशामुळं...पर्थमधील सामना आम्ही जिंकल्यानंतर वाटलं होतं की, प्रशिक्षक गौतम गंभीरचा संघ न्यूझीलंडविरुद्धचं चटका लावणारं अपयश ऑस्ट्रेलियन भूमीवर पुसून टाकेल. पण कर्णधार रोहित शर्माच्या संघानं दर्शन घडविलं ते अक्षरश: एकामागून एक अशा चुकांचं. त्यातील बहुतेक या अयोग्य संघनिवडीतून जन्मलेल्या...
भारतानं वेगवान गोलंदाजांना भरभरून मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर फार मोठी चूक केली ती फलंदाजांची संख्या वाढवून. शिवाय काही अपयशी, पण अनुभवी खेळाडूंना संधी मिळावी म्हणून तडजोडीही करण्यात आल्या. सर्वांत महत्त्वाची त्रुटी म्हणजे जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी मोहम्मद शमीसारखा गोलंदाज तिथं हजर नसताना चौथ्या योग्य गोलंदाजाची निवड न करणं. मोहम्मद सिराजनं अपेक्षेहून चांगल्या कामगिरीची नोंद केली हे सुद्धा मान्य करावं लागणार असलं, तरी बुमराहला अतिताण वाहावा लागला ही वस्तुस्थिती. त्याचा परिणाम लगेच सिडनी कसोटीत दिसून आला. त्यानं दुसऱ्या डावात गोलंदाजी केली असती, तर कदाचित कांगारुंना भारतानं गारद देखील केलं असतं. जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढल्यानं त्याला किती काळ बाहेर राहावं लागतं हे आता बघावं लागेल...
गौतम गंभीर अन् त्यांना मदत करणारे त्यांचे साथीदार मेलबर्न कसोटीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर अक्षरश: गोंधळले हे नाकारता येणार नाही. याउलट बॉर्डर-गावस्कर चषक तब्बल एका दशकानंतर आपल्या खात्यात जमा केल्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, त्यांनी पर्थमधील पराभवानंतर सारा भर दिला तो शांत चित्तानं शिल्लक राहिलेल्या चार कसोटी सामन्यांत भारताला तोंड देण्यावर...रोहित शर्माला पाचव्या कसोटीत वगळण्याचा अभूतपर्व निर्णय संघव्यवस्थापनानं घेतला, पण त्यासंबंधी अधिकृत माहिती शेवटपर्यंत जाहीर केली नाही. त्यामुळं शर्माला त्यानंच संघासाठी त्याग केलाय असां सांगून नामुष्कीपासून वाचण्याचा मार्ग मोकळा झाला. या घटनेचाही मानसिक परिणाम आपल्यावर शेवटच्या सामन्यात झाल्याशिवाय राहिला नाही...
अप्रतिम प्रतिभा, परिस्थितीचा केलेला योग्य अभ्यास यांच्या जोरावर पर्थमधील कसोटी जिंकणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या संघाची रचना रोहित शर्मा परतल्यानंतर गडबडली. रोहितला संधी मिळावी म्हणून घेतलेले निर्णय अंगावर उलटले...उदाहरणार्थ के. एल. राहुलचा सलामीला जम बसलेला असताना अन् त्याची यशस्वी जैस्वालसमवेत भट्टी जुळलेली असताना त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्यात आलं. मग पुन्हा सलामीचा फलंदाज म्हणून सिडनीत त्याच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली ती रोहित शर्मा नसल्यानं...विदेशात नेहमी ‘कभी खुशी, कभी गम’ अशी परिस्थिती राहिलेल्या शुभमन गिलनं अॅडलेड कसोटीत बऱ्यापैकी कामगिरी नोंदविली. पण रोहितनं आघाडीला जाणं पसंत केल्यानं त्यालाही मेलबर्नमध्ये बाहेर बसावं लागलं...
सर्फराज खानला एकही संधी देण्यात आली नाही, तर या मालिकेतील जलद गोलंदाजांना सर्वांत जास्त मदत केलेल्या सिडनीतील खेळपट्टीवर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरच्या ऐवजी चौथा वेगवान गोलंदाज खेळविणं जास्त उपयोगी ठरलं असतं. या पार्श्वभूमीवर पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाळी आली ती प्रसिद्ध कृष्णा व मोहम्मद सिराज यांच्यावर अनुक्रमे तब्बल 24 आणि 27 षटकं टाकण्याची. तसं पाहिल्यास दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी तीन बळी मिळविणाऱ्या कृष्णावर सुद्धा सिरीजमध्ये अन्यायच झाला...नितीश रे•ाrनं फलंदाजी अपेक्षेहून चांगली केलेली असली अन् बहुतेक डाकंत त्यानं एखादा तरी बळी मिळविलेला असला, तरी तो उच्च दर्जाचा गोलंदाज अजूनपर्यंत झालेला नाही हे क्रिकेटचं ज्ञान असणारा कुणीही मान्य करेल. त्याच्या मध्यमगतीत कांगारुंवर दबाव घालण्याची क्षमता नसल्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना चक्रव्युहात अडकविणं कित्येकदा शक्य झालं नाही अन् ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी देखील बुमराहला विश्रांती मिळणार नाही याची छान पद्धतीनं काळजी घेतली...रविचंद्रन अश्विन नि रवींद्र जडेजा या दोन अन्य फिरकी गोलंदाजांना तिथं फारसा वाव नव्हता हे प्रत्येक कसोटीतील खेळपट्टीनं स्पष्ट केलं.
फलंदाजीचा विचार करता कित्येकदा भारतीय संघ कसोटीत खेळतोय की, ‘टी-20’ स्पर्धेत असा प्रश्न पडण्याजोगं वातावरण राहिलं. कदाचित प्रशिक्षक व कर्णधार यांना त्या प्रकारात प्रचंड यश मिळालेलं असल्यामुळं संघाची वाटचाल त्या पद्धतीनं झालेली असावी...आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या रे•ाrच्या शतकानं मेलबर्नवर मर्यादा साफ उघड्या पाडल्या त्या खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहली नि रोहित शर्माच्या. दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीला स्पर्श केला होता तो कारकीर्द पुन्हा एकदा 360 अंशांत फिरविण्याच्या जिद्दीनं...
परंतु कोहली प्रत्येक डावात ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूवर बॅट चालविण्याचा मोह आवरता न आल्यानं बाद होऊन बसला अन् ही त्रुटी वारंवार दिसत असूनही त्या सापळ्यात अडकण्यापासून स्वत:ला दूर ठेवणं जमलं नाही...विराटनं गेल्या 40 कसोटी सामन्यांत केवळ 32.29 धावांची सरासरी नोंदविलीय. गतवर्षात ती राहिली 22.47 इतकी कमी, तर ऑस्ट्रेलियातील पाच सामन्यांत 23.75 अशी. स्कॉट बोलँडनं त्याच्या वरील कमकुवत दुव्याचा फायदा उठवून तब्बल चार वेळा परतीची वाट दाखविली. विराट कोहलीनं प्रत्येक कसोटीपूर्वी अक्षरश: प्रचंड सराव केला. परंतु कदाचित घात झालेला असावा तो वाढत्या वयामुळं नि मंदावलेल्या पायाच्या हालचालींमुळं...
रोहित शर्मा हा विराट कोहलीपेक्षा कधीही सरस फलंदाज राहिलेला नसला, तरी त्याचं संघातील महत्त्व विराटएवढंच. भारताच्या 2024-25 मोसमात झालेल्या कसोटी सामन्यांतील त्याची फलंदाजी ‘भयानक’ अशीच म्हणावी लागेल अन् त्याचा परिणाम झाला तो त्यानं कर्णधार या नात्यानं घेतलेल्या निर्णयांवर. त्याचं पुनरागमन घडविण्याची क्षमता आहे ती एकदिवसीय क्रिकेटमध्येच. त्यादृष्टीनं पहिली कसोटी लागेल ती येत्या महिन्यात होणाऱ्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेत...खरं तर नितीश रे•ाr, हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वाल यांचा अपवाद सोडल्यास प्रत्येकानं ऑस्ट्रेलियातील वातावरणाचा अनुभव घेतलेला होता. त्यामुळं या नव्या खेळाडूंवर टीका करणं योग्य ठरणार नाही अन् रे•ाr, जैस्वाल यांनी तितका वावही न ठेवलेला....
सिडनी कसोटी संपल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भर दिला तो प्रत्येकानं रणजी चषकसारख्या देशी स्पर्धेत खेळण्याचा. महान सुनील गावस्करनी सुद्धा बोट ठेवलंय ते याच मुद्यावर. परंतु आपल्या फलंदाजांसाठी नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या, फलंदाजांना शतकांचे डोंगर सहज रचता येणाऱ्या आणि गोलंदाजांची दमछाक करणाऱ्या खेळपट्ट्यांची ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड येथील वातावरणाशी, तेथील खेळपट्ट्यांशी तुलना करणं बरोबर ठरणार नाहीये. असं असलं, तरी आपल्या त्रुटी ओळखून त्या सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याकरिता या देशी स्पर्धा उपयोगी पडू शकतात हेही तितकंच खरं...याशिवाय प्रत्येक प्रशिक्षक बदलल्यानंतर ‘सपोर्ट स्टाफ’ सुद्धा बदलण्याच्यी परंपरा आपल्याकडे गरजेविना रूढ झालीय...
बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेनं केवळ खेळाडूंचीच कारकीर्द धोक्यात आणलीय असं नव्हे, तर स्वत: खेळताना एक अतिशय आक्रमक खेळाडू म्हणून ओळखल्या गेलेल्या गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक या नात्यानं जागा देखील सध्या धोक्यात आलीय...भारतासमोर आता मुख्य आव्हान असेल ते इंग्लंडला त्यांच्या भूमीत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तोंड देण्याचं अन् संघाला ग्रासलेल्या समस्यांवर उतारा काढण्याचं !
रोहित शर्माची कर्णधार या नात्याने कसोटीत कामगिरी...
- गट सामने विजयी अनिर्णीत/टाय पराभूत
- एकूण 24 12 3 9
- परदेशात 8 2 2 4
गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून संपूर्ण कारकीर्द...
- प्रकार सामने जिंकले गमावले टाय अनिर्णीत
- कसोटी 10 3 6 - 1
- वनडे 3 - 2 1 -
- टी-20 6 6 - - -
आयपीएल प्रशिक्षक म्हणून कारकीर्द...
- संघ मोसम सामने जिंकले गमावले निकाल न लागलेले
- एलएसजी 2022-23 30 17 12 1
- केकेआर 2024 15 11 3 1
(‘केकेआर’चा कर्णधार म्हणून गंभीरनं संघाला 2012 आणि 2014 साली आयपीएल’चं जेतेदप जिंकून दिलंय, तर 2024 मध्ये तो ‘आयपीएल’ विजेत्या संघाचा प्रशिक्षक राहिला)
-राजू प्रभू