तीन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कंठस्नान
वृत्तसंस्था / अखनूर
जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात भारतीय सैनिकांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला होता. मात्र, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नव्हती. या हल्ल्यानंतर या भागाची नाकेबंदी करण्यात आली होती आणि सैनिकांनी हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता.
हल्ला करुन लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात आले आणि त्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास प्रारंभ केल्याने सैनिकांनीही चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भट्टल भागात हा हल्ला केला होता. नंतर या भागापासून काही अंतरावर सैनिक आणि दहशतवादी यांच्याच चकमक झाली.
हल्ला कसा झाला...
सोमवारी सकाळी भट्टल भागातील वनक्षेत्रात असलेल्या शिव आसन मंदिरात दहशतवादी एक मोबाईल शोधत होते. त्यांना कोणालातरी कॉल करायचा होता. याचवेळी भारतीय सेनेची एक रुग्णवाहिका या मंदिराजवळून गेली. दहशतवाद्यांनी या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला आणि ते पळून जाऊन लपून बसले. हे दहशतवादी हल्ल्याच्या आधी एक दिवस अखनूरमध्ये आले होते.
दोन आठवड्यांमध्ये तिसरा हल्ला
या भागात झालेल्या दोन आठवड्यांमधील हा तिसरा हल्ला आहे. या तीन हल्ल्यांमध्ये मिळून 3 सैनिक हुतात्मा झाले आहेत. तर 8 बिगरस्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. सहा दहशतवादीही मारले गेले आहेत. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी परप्रांतीय कामगारांची हत्या करीत आहेत, अशी माहिती देण्यात आली.