तीन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा
जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला
वृत्तसंस्था/जम्मू
जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी उधळून लावला आहे. लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी देण्यात आली. पूंछ जिह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न गुरुवारी लष्कराच्या जवानांनी उधळून लावला, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. सतर्क सैन्य दलांना खारी करमारा भागात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हालचाली दिसल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. लष्कराच्या गोळीबारात तीन दहशतवादी जायबंदी झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास हे दहशतवादी मारले गेल्याचीही माहिती देण्यात आली. घनदाट जंगलातील शोध मोहीमेत तिघांचेही मृतदेह सापडले आहेत.