For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ढोरवाडा चव्हाट गल्लीतील आग दुर्घटनेच्या तपासासाठी तीन पथके

06:24 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
ढोरवाडा चव्हाट गल्लीतील आग दुर्घटनेच्या तपासासाठी तीन पथके
Advertisement

घातपात झाल्याचा संशय : कसोशीने तपास सुरू

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

घातपातामुळे ढोरवाडा चव्हाट गल्ली येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी तीन विशेष तपास पथकांची स्थापना केली आहे. त्यानुसार पोलीस कसोशीने तपास करीत असून याबाबत स्वत: पोलीस आयुक्त प्रसारमाध्यमांना माहिती देणार आहेत.

Advertisement

गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्री आगीत होरपळून शारदा गजानन धमोणे (वय 48), प्रिया गजानन धमोणे (वय 27), गंगा गजानन धमोणे (वय 24), भारती राजाराम धमोणे (वय 50) यांचा मृत्यू झाला. तर दुसरे दिवशी जखमी गजानन राजाराम धमोणे (वय 58), रोशन गजानन धमोणे (वय 21) या बापलेकाचाही मृत्यू झाला. सुरुवातीला शॉर्टसर्किट किंवा अन्य कोणत्या तरी कारणामुळे शेडवजा घराला आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ज्या दिवशी आगीची घटना घडली त्या दिवशी पाठीवर बॅग व हातात बकेट असलेला एक इसम धमोणे कुटुंबीयांच्या घराकडे येतो. काही वेळातच तो पुन्हा तेथून धावत सुटतो. पण त्यावेळी त्याच्या हातात बकेट नव्हते. त्यामुळे संबंधित इसमाने एखादा ज्वालाग्रही पदार्थ फेकून पलायन केल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. तीन विशेष तपास पथकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली असून काही पथके महाराष्ट्रात ठाण मांडून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.