म्हापसा जिल्हा इस्पितळातील तिघे निलंबित
एलडीसी, दोन रुग्णवाहिका चालकांचा समावेश : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची धडक मोहीम,अचानक भेट देऊन पाहिला दैनंदिन कारभार,रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांची केली विचारपूस
म्हापसा : येथील जिल्हा इस्पितळात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आकस्मिक भेट देऊन तेथे भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान काही डॉक्टर आपली ड्युटी बजावताना डॉक्टरांचा पांढरा शर्ट घालत नसल्याने मंत्र्यांनी त्यांना बरेच फैलावर घेतले. डॉक्टरांनी ड्युटी बजावताना शिस्तीचे पालन करावे, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात त्यांना सुनावले. रुग्णवाहिका चालक व एलडीसी यांच्या गैरवर्तनाबाबत त्यांच्यावर कारवाई म्हणून एलडीसी गुरुदास पेडणेकर तसेच रुग्णवाहिका चालक सुबोध नाईक व यशवंत गावठणकर यांना निलंबित करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.
आरोग्यमंत्री म्हणाले की, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळातील गैरवर्तवणूक, गैरकारभार व मशिनमध्ये बिघाड झाल्याचे लेखी पत्र आपल्यास पाठविले होते त्याची दखल घेत आपण आकस्मिक भेट दिली. यापुढे गोव्यातील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये रक्त चाचणी करताना कॅन्सरच्याही चाचण्या करून घेण्याची पद्धत आणली जाईल. सरकारने इस्पितळे लोकांच्या सेवेसाठी बांधली आहेत. रुग्णांना सर्व सेवा पुरविल्या जातील. शितल लेलेसारखे वरिष्ठ डॉक्टर आहे. अजून काही डॉक्टर्सची आवश्यकता आहे. सर्व डायलेसीस सेंटरमध्ये ज्या कमतरता भासत आहेत त्याकडे लक्ष पुरविले जाईल. ब्लड बँकबाबत आपण समाधानी आहे, असेही ते म्हणाले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास व विचारधारेची अंमलबजावणी करीत आहोत. रुग्णवाहिकांची कमतरता आहे ती पूर्ण करण्यात येईल.
सीटी स्कॅन मशिन लवकर उपलब्ध करू
म्हापसा जिल्हा इस्पितळात सीटी स्कॅन मशीन गेल्या सात महिन्यांपासून बिघडलेल्या अवस्थेत आहे. नवीन मशीन मागविणार आहोत. संशयित आरोपी रुग्णांसाठी वेगळा कक्ष सुरु करण्यात येईल. फार्मसीच्या वेळेबाबत रुग्णांच्या तक्रारी आहेत. शवागाराकडे लक्ष देण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. रुग्णांशी संवाद साधून येथे दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतली. डॉक्टर्स तसेच परिचारिकांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्य सेवेत आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती घेतली.
खासगी रुग्णवाहिका चालविणाऱ्यांवर कारवाईचे संकेत
काही सरकारी चालक खासगी रुग्णवाहिका चालवितात. ते बंद होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्यास त्या सर्व खासगी रुग्णवाहिका व चालविणाऱ्यांचे नंबर व नावे द्यावीत जेणेकरून आपण प्रत्यक्ष याबाबत आरोग्य खात्यामार्फत त्यांची पोलिस तक्रार दाखल करणार आहे.