डॉ. रेड्डी खून प्रकरण ; तीन संशयित कणकवली पोलिसांच्या ताब्यात
कणकवली
कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे धारदार शस्त्रांनी वार करून खून केलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांची असल्याचे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण (LCB) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत केलेल्या तपासात निष्पन्न केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान करत एलसीबी आणि कणकवली पोलिसांच्या तीन पथकांनी थेट बेंगळुर येथे तळ ठोकून अथक तपास केला.
या तपास मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, डॉ. रेड्डी यांच्या खुनाच्या कटात सहभागी असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात कणकवली पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.संशयितांना ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांचे एक पथक बुधवारी पहाटे कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. तर, खुनाच्या कटातील चौथ्या संशयिताला ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांचे दुसरे पथक बेंगळुरहून कणकवलीच्या दिशेने निघाले असून, ते आज बुधवारी सायंकाळपर्यंत कणकवलीत दाखल होण्याची शक्यता आहे.सुभाष सुब्रायप्पा एस ( ३२, रा. अलवत्ता तिमसंग्रा, श्रीनावस पुरम, जि. कोलार, कर्नाटक ), नारायण स्वामी मूर्ती (३६, रा. अलवत्ता तिमसंग्रा, श्रीनावस पुरम, जि. कोलार, कर्नाटक), मधुसूदन सिद्दय्या तोकला ( ५२, रा. बेंगळुर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळे डॉ. रेड्डी यांच्या खुनामागील गूढ उलगडण्यास मदत झाली असून, लवकरच या खुनाचे नेमके कारण आणि कटात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा पुढील तपास वेगाने सुरू आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासणी आणि चौकशीसाठी पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.