तीन गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास
खडेबाजार, भेंडीबाजार, दरबार गल्लीत रस्त्यावर कापड विक्री करणाऱ्यांवर निर्बंध
बेळगाव : दर मंगळवारी खडेबाजार, भेंडीबाजार, दरबार गल्ली येथे दुकानांसमोर कपड्यांचे व्यापारी बसून व्यवसाय करीत होते. सदर व्यापाऱ्यांमुळे गल्लीत प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनने बैठक घेऊन मंगळवार दि. 4 पासून यापुढे दुकानांबाहेर बसून व्यापार करणाऱ्यांना मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे. दर मंगळवारी गजबजणाऱ्या गल्ल्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. यापुढे दर मंगळवारी दुकानांसमोर बसून व्यापार करणाऱ्यांना निर्बंध घातले जाणार आहे.
बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करणाऱ्या बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्याचबरोबर बहुतांश व्यापाऱ्यांनी अतिक्रमणही केले आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही त्या कारवाईला म्हणावे तसे यश आलेले नाही. खडेबाजार, भेंडीबाजार आणि दरबार गल्लीत दर मंगळवारी बाहेरील व्यापारी येऊन कपड्यांचा व्यवसाय करीत होते.
सदर व्यापारी दुकानांबाहेर रस्त्यावर बसून व्यवसाय करत असल्याने त्या ठिकाणी दर मंगळवारी प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली होती. ही बाब लक्षात घेत रस्त्याच्या कडेला बसून कापड व्यवसाय करणाऱ्यांना मज्जाव करण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार मंगळवार दि. 4 पासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी तिन्ही गल्ल्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.