तीन श्रीलंकन नागरिकांना अटक
बेंगळुरात बेकायदा वास्तव्य प्रकरणी कारवाई
बेंगळूर : बेंगळूरच्या देवनहळ्ळी येथील अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन श्रीलंकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बेंगळूर सेंट्रल गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांच्या नार्कोटीक्स विभागाने सोमवारी ही कारवाई केल्याची माहिती दिली आहे. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तीन श्रीलंकन नागरीक वास्तव्यास असल्याची खात्रीलायक माहिती 25 सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीसीबी पोलिसांच्या पथकाने अपार्टमेंटवर धाड टाकून तिघांना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी 2024 मध्ये श्रीलंकेच्या जाफना येथून तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय प्रवेश केला. बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षभरापासून देवनहळ्ळी पोलीस हद्दीत हे आरोपी वास्तव्यास होते. ते तिघेही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज डिलर्स असल्याचा पोलिसांना संशय आहे. एका आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत श्रीलंकेच्या दुतावासाला सीसीबी पोलिसांनी माहिती दिली आहे. अधिक चौकशीच्या उद्देशाने त्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.