For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नमो’ नेतृत्वाचे तीन विशेष : प्रदेश, भाषा आणि वेष!

12:22 PM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नमो’ नेतृत्वाचे तीन विशेष   प्रदेश  भाषा आणि वेष
Advertisement

परंपरागतरित्या राजकीय नेते आपल्या पोषाखाच्या बाबत विशेष आग्रही व पारखी असतात. या पुढाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वापासून वक्तृत्व-कर्तृत्वापर्यंत व मंडळींच्या पोषाख परिधानाचा प्रभाव स्पष्टपणे व दीर्घकाळपर्यंत दिसून येतो.  काही नेत्यांच्या पोषाखाचा परिचयच मुळी त्यांच्या नावासह होत असतो, हा इतिहास आहे. व्यवस्थापनाच्या व्यवस्थापकीय परिभाषेत यालाच इअ म्हणजेच इaम ओs Addrाss व्यवस्थापन पद्धती म्हणता येईल. पं. नेहरुंची गांधी टोपीसह व गुलाबाच्या फुलासह असणारी वेषभूषा, वंगबंधू मुजीबचे विशेष काळे जाकिट ही जागतिक स्तरावर कधी चर्चित असणारी नावे यासंदर्भात प्रामुख्याने सांगता येतील. या आणि अशा मोठ्या आणि मुख्य पुढाऱ्यांप्रमाणेच पंतप्रधान मोदी हे त्यांच्या चोखंदळ व वैशिष्ट्यापूर्ण व प्रसंगी प्रासंगिक विशेष वेषभूषेसाठी जगात प्रसिद्ध झाले आहेत. मोदींप्रमाणेच त्यांच्या पोषाखाचा प्रभाव भारत आणि भारतीयांवरच नव्हे तर विशेष विदेशी पाहुण्यांवर कसा पडतो ते आपण वेळोवेळी पाहतोच. त्यामुळेच मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरलेल्या मोदींच्या मोदी पोषाखाची चर्चा विविध संदर्भात होणे अपरिहार्य ठरते. तसे पाहता पुढाऱ्यांचा पोषाख त्यांच्या जनसंपर्कापासून जनसमर्थनापर्यंतचे एक मोठे व प्रमुख माध्यम ठरते. आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी पोषाखाचे हेच महत्त्व जाणून स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेतेमंडळी आपल्या पोषाखाच्या संदर्भात काळजी तर घेतातच, मात्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोषाखाच्या संदर्भात विशेष दर्जा आणि चोखंदळता प्राप्त करून दिली असल्याचे स्पष्ट मत सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुधन्वा देशपांडे व्यक्त करतात.

Advertisement

त्यांच्या मते स्वत: नरेंद्र मोदी चर्चा, बैठकीपासून सभा, संमेलनापर्यंतच्या विविध प्रसंगी आपल्या नेतृत्व-कर्तृत्व व वक्तृत्वाला प्रासंगिक-समर्पक व योग्य साथ देण्यासाठी प्रसंगानुरुप कपड्यांचा वापर करतात हे आता सर्वविहित झाले आहे. यासंदर्भातील नवे व ताजे उदाहरण द्यायचे म्हणजे त्यांच्या नुकत्याच झालेल्या दक्षिण भारतातील मंदिर यात्रांच्या दरम्यान केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर स्थानिक रीती रिवाजांनुसार पोषाख करून सर्व परंपरांचे पालन केले. या उलट नव्या संसद भवनातील प्रथम प्रवेश असो अथवा अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना अशा वेळी नरेंद्र मोदी आवर्जुन पारंपरिक पूजा पोषाखात उपस्थित असतात. तर उद्योगपती वा व्यापारी संस्था प्रमुखांशी चर्चा करताना साजेसा कार्यालयीन पोषाख घालतात. मुख्य म्हणजे या सर्व ठिकाणी व प्रसंगी त्यांचा पोषाख संबंधित विशेष प्रसंगाशी निगडित असतो. यासंदर्भात अधिक कानोसा घेता असे दिसून येते की,  मोदीजींचा वेष-संदेश हा आगळा ताळमेळ त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासूनच सुरू आहे. त्यासंदर्भात मुख्य व जाणवण्याजोगा बदल म्हणजे नरेंद्र मोदींचे त्यावेळी म्हणजेच सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यांच्या कपड्यांचा रंग तुलनेने आजच्यापेक्षा भडक असायचा. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपल्या कपड्याच्या रंगछटा व रंगसंगती बदललेली जाणकार मंडळी सांगतात. या विषयातील एक प्रमुख जाणकार व दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या टेक्सस्टाईल  डिझाईन विभागातील वरिष्ठ प्राध्यापक अशिया  तिवारी यांच्यानुसार नरेंद्र मोदी यांना परंपरागत भारतीय कापड आणि कपड्यांची मुलभूत आणि चांगली जाण आहे. त्यानुसार ते आपल्या पोषाखांची त्यांची रंगसंगती आणि प्रकारांची निवड करतात.

आपल्या वेषभूषेत मोदीजी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नाविन्य, प्रथा-परंपरा व त्याचबरोबर नाविन्य यांचा नेमका मेळ पंतप्रधान झाल्यावर मोदीजी सातत्याने घालत आले. उदाहरणार्थ ते राजस्थानच्या दौऱ्यावर जातील तर राजस्थानच नव्हे राज्यांतर्गत मारवाड, थार, शेखावटी पद्धतीच्या पारंपरिक व रंगीबेरंगी साफा ही त्यांची स्वाभाविक पसंत असते. उत्तराखंडसारख्या पहाडी राज्यात रंगीत टोपी परिधान करतात तर दक्षिणेत विशिष्ट पद्धतीची लुंगी. महाराष्ट्रातील संत नगरी देहूमध्ये वारकरी पोषाखासह सहभागी पंतप्रधानांची छबी तर चिरस्मरणीय ठरली. याशिवाय स्वातंत्र्यदिन वा गणतंत्रदिनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण संबोधन करताना भारतातील विविध प्रांतांचे प्रतिनिधीत्व करणारे पोषाख जेव्हा सातत्याने करतात तेव्हा त्यामागची त्यांची योजकता-कल्पकता स्पष्ट होते व लोकांच्या लक्षात राहते. आपल्या वेषभूषेद्वारा जनसामान्यांशी जोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न अनोखा ठरला आहे. मोदीजींच्या पेहरावाची दखल त्यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या टप्प्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली व ती पण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह झालेल्या भेट व चर्चेच्या दरम्यान. त्यावेळी शी जिनपिंग यांच्यासह मोदीजींनी परंपरागत कुर्ता-चुडीदाराच्या जोडीलाच आकर्षक गॉगलसह काढलेली सेल्फी त्यावेळी भारत-चीन चर्चेप्रमाणेच जागतिक चर्चेचा विषय बनली होती. त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार समाज माध्यमाद्वारे सेल्फीला जगभरातील सुमारे 3 कोटी लोकांनी दाद दिली. याचीच नोंद घेत ‘न्युयॉर्क टाइम्स’ च्या फॅशनपुरवणीने मोदी व जिनपिंग यांच्या सेल्फीची दखल घेत टिप्पणी केली की मोदींनी आपले वेगळेपण धोरणात्मक स्वरुपातच नव्हे तर दिसण्यातपण सिद्ध केले हे महत्त्वाचे आहे.

Advertisement

जागतिक संदर्भातसुद्धा ही बाब स्पष्ट झाली आहे की, राजकारण व देशपातळीवर पुढारीपण वा नेतृत्व करणाऱ्यांसाठी त्यांच्या कपड्यांचे विशेष महत्त्व वादातीत ठरले आहे. वेषभूषेमुळे नेतृत्वाचा प्रभाव वाढतो, कर्तृत्वामुळे त्याला पाठबळ मिळते तर नेतृत्वामुळे अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व उजळते असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. विशेष वेषभूषेसह पुढारी व्यक्तीने भाषण केल्यास अशा भाषणातून उपस्थितांसाठी संदेश जातो व हा आणि असा संदेश प्रसंगी कायमस्वरुपी परिणामकारक ठरतो. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्या असणाऱ्या अलेक्झांड्रिया ओसियो कॉट्रेझ यांच्या संदर्भात सांगण्यासारखी विशेष बाब म्हणजे त्यांची राहणी, वेषभूषा, रंगसंगती ही नेहमीच लॅटीन शैलीची असते व आज हीच बाब त्यांचे विशेष वैशिष्ट्या ठरले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास, सभा, संमेलने वा त्यांनी गाजविलेले विशेष प्रसंग इ. साऱ्यामध्ये त्यांच्या वेषभुषेत कसलाही बदल होत नाही व त्यांच्या याच मुद्याला  मोठा प्रतिसाद मिळतो. अलेक्झांड्रिया यांनी यासंदर्भात नव्याने व आवर्जुन नमूद केलेली बाब म्हणजे व्यक्तीची राहणी व वेषभूषा त्यांच्या संवादाचे पूरक व महत्त्वाचे साधन असते. संबंधित व्यक्तीसह कुणाला आवडो वा न आवडो सार्वजनिक पुढाऱ्यांच्या पोषाखातून जनसामान्यांना संदेश आवश्य जातो व त्यासाठी प्रत्येकवेळी भाषण करावेच लागते असे नाही, ही  टिप्पणी पुरेशी बोलकी ठरते. पोषाख तज्ञ आशिया तिवारी यांच्यानुसार पंतप्रधान मोदींचे प्र्रस्तावित कार्यक्रम व त्यांची विशेष प्रासंगिकता यावर आधारित वेषभूषेचे अभ्यासपूर्वक व विशेष प्रयत्नांसह पूर्व नियोजन केले जाते. या नियोजनामध्ये आणखी काय केल्याने प्रभाव वाढण्यास अथवा प्रासंगिकतेचे औचित्य साधण्यास मदत होऊ शकते याचा विशेष अभ्यासपूर्वक अवलंब केला जातो. याचे प्रत्यंतर आपल्याला नेहमी तर दिसतेच त्याशिवाय विशेष प्रसंगी आपल्याला त्याचा विशेष प्रत्यय येतो.  मोदीजींची आंतरराष्ट्रीय संमेलने, राजकीय सभा, सार्वजनिक संमेलने, राष्ट्रीय वा विशेष आयोजन, धार्मिक भेटी वा पूजा प्रसंग, सीमेवर जवानांसह कार्यक्रम असो वा नौदल-वायुदल स्थळांवरील कार्यक्रम मोदीजी त्या त्या प्रसंगानुरुप आपली वेषभूषा ठरवितात व ठेवतात. अधिक तपशिलासह पाहिल्यास दिवाळीला सीमेवरील सैनिकांसह दरवर्षी दिवाळी मनविणारे मोदीजींची वेषभूषा संबंधित सीमावर्ती क्षेत्रात सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांमध्ये मिसळतांना वेगळी असते व इंडो-तिबेट तुकडीमध्ये असताना वेगळी असते हे विशेष.

अर्थात मोदीजींच्या वेषभूषेवर बऱ्याचदा कठोर टीका झालेली आहे. यावर लोकसभेत बोलतांना मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान दिवसा 500 कुर्ते बदलवू शकतात अशी अतिशयोक्ती नमूद केली. मात्र नरेंद्र मोदी या संदर्भात विशेष टीकेच्या घेऱ्यात सापडले होते. उत्तराखंडच्या निवडणूक प्रचारातील एका सभेत अत्यंत महागडा सूट घालून भाषण करतानाचे छायाचित्र प्रकाशित झाले व ते बरेच गाजले. प्रत्यक्षात हा वेष त्यांना त्यांच्या मित्राने 2015 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीसाठी जाण्याच्या निमित्ताने दिला होता. या विशेष वेषावर मोदीजींचे नाव वेगवेगळया प्रकारे कोरले होते या निमित्ताने त्यावेळी मोदी विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची मोठी संधी मिळाली व त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. प्रत्यक्षात मोदींनी त्यांच्या कार्यशैलीनुसार दरवर्षी त्यांना मिळणाऱ्या विशेष भेटवस्तुंच्या जाहीर लिलाव पद्धतीनुसार या भेट म्हणून मिळालेल्या सूटचा पण लिलाव करविला व त्याची रक्कम ‘नमामी गंगे’ प्रकल्पाला समर्पित केली. गिनिज इतिहास नोंदीनुसार एका लिलाव बोलीमध्ये सर्वाधिक रक्कम देणारी वस्तू म्हणून मोदींच्या त्या भेट पोषाखाची नोंद झाली. मात्र मित्राकडून मिळालेला हा पोषाख मोदीजींनी राजकीय संदर्भात महागडा पडला. त्या घटनेनंतर काही काळ मोदी सरकारची संभावना ‘सूट बूट की सरकार’ म्हणून विरोधकांकडून करण्यात आली व त्यावेळच्या विधानसभा निवडणुकींमध्ये त्याची किंमतपण मोजावी लागली होती. सुरुवातीला नमूद केलेल्या व्यक्तिमत्त्व वैशिष्ठ्यांपैकी त्यांच्या वेष राहणीभूषेची चर्चा प्रामुख्याने होते. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित असे प्रदेश आणि भाषा हे मुद्दे मोदीजींना नेहमीच पूरक व हजारोंना प्रसंगानुरुप ठरतात याचा अनुभव प्रसंगानुरुप येत असतो. अर्थात हे सारे जुळून येण्यासाठी मोदीजींनी प्रसंगी अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत.

मोदीजींचे वक्तृत्व आज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ठरले आहे. त्यासाठी अर्थातच मोठे आणि सातत्याने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. आपल्या फर्ड्या वक्तृत्वाला मोदीजी प्रादेशिक भाषा वा स्थानिक बोलींची जी जोड देतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भाषणाची परिणामकारकता वाढते. भारतात बोलताना गुजराती, हिंदी व इंग्रजीचा प्रभावी वापर ते करतातच. दक्षिण गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ संघटनात्मक काम केल्याने त्यांना मराठी चांगले येते. याशिवाय चंदीगड, हिमाचल क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्याने त्यांना पहाडी परिसरातील डोंगरी-गढवाली यासारख्या  बोलीभाषा येतात व त्यांचा ते प्रसंगानुरुप प्रभावीपणे वापर आपल्या भाषणांमध्ये करतात. मात्र आपल्या बहुभाषिक देशामधील विभिन्न प्रादेशिक भाषांचा वापर आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीला ज्या बेजोडपणे ते करतात त्याला तोड नाही. त्यामुळेच मैथिली, असमियापासून मल्याळम-तामिळ पर्यंतच्या सर्वच भाषांमधून भाषणाच्या सुरुवातीलाच उपस्थितांशी संवाद साधून ते जी छाप सोडतात ती बेजोड ठरते. आपल्या पंतप्रधानांच्या बहुभाषिक होण्याच्या आयामाला आता त्यांच्या नावलौकिकाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय जोड लाभली आहे. याचे प्रत्यंतर दुबईच्या जगप्रसिद्ध ठरलेल्या स्वामीनारायण मंदिर पूजन, उदघाटनप्रसंगी मोदीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात अरबी भाषेत करून त्याला उत्स्फूर्त व मोठा प्रतिसाद करून आपल्या जागतिक स्तरावरील उत्स्फूर्त भाषण पद्धतीला नव्या संदर्भात जगमान्यता मिळवून दिली. मोदीजींचे भाषण संवादादरम्यान अन्य प्रमुख वैशिष्ठ्या म्हणजेच त्यांची संवादशैली व समयसुचकता. संसदेत वा राजकीय भाषणात तर त्याचे प्रत्यंतर वारंवार येते. याशिवाय अन्य प्रमुख उदाहरणे म्हणजे ते अत्यंत अनौपचारिकपणे वनवासी ग्रामीणांशी बोलतात तर तेवढ्याच निरागसपणे विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करतात. संवादाच्या संदर्भात वर नमूद केलेली प्रमुख उदाहरणे मर्यादित व निवडक स्वरुपात असली तरी त्यामुळे नरेंद्र मोदींचे नेता, वक्ता असे दुहेरी महत्त्व नेहमीसाठी अधोरेखित होते.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.