For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशभरात गाजतायत गोव्याचे तीन सुपुत्र

01:09 PM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशभरात गाजतायत गोव्याचे तीन सुपुत्र
Advertisement

 आर्लेकर, गिरीश चोडणकर तर बंगालमध्ये सतीश धोंड : कडक भूमिकेमुळे आर्लेकर यांनी स्वत:कडे लक्ष वेधून घेतले

Advertisement

पणजी : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यातील तीन भूमिपुत्र बरेच गाजले. त्यातल्या त्यात ज्यांच्याजवळ तामिळनाडूच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी आहे ते राजेंद्र आर्लेकर सध्या बरेच गाजत आहेत. संपूर्ण देशात अनेक घटनातज्ञ त्यांच्यावर आरोप करीत आहेत. शिवाय काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी देखील त्यांच्यावर थेट आरोप करू लागले आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल असलेले गोव्याचे सुपुत्र राजेंद्र आर्लेकर यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे उपदेश अनेक राजकीय नेते करू लागले आहेतच, शिवाय एका वृत्तवाहिनीचा अतिउत्साही पत्रकार देखील राज्यपालांचे कसे चुकत आहे हे सांगत आहे. अनेक नेत्यांकडून व काही वकिलांकडून देखील त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया घेत आहे.

तामिळनाडूमध्ये त्रिशंकू परिस्थिती

Advertisement

तामिळनाडूमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. यातील प्रमुख पक्ष म्हणजे टीव्हीके, जो सत्तेच्या एकदम जवळ पोहोचलेला आहे. परंतु बहुमतासाठी त्याला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. सत्तेवरून पायउतार झालेला दुसरा पक्ष म्हणजे द्रमुक, या पक्षाकडे त्यांनी केलेल्या युतीमुळे 75 आमदार आले आहेत. दुसऱ्या बाजूला या सत्ता पक्षाच्या विरोधात ज्यांनी शड्डू ठोकले तो पारंपरिक शत्रू पक्ष म्हणजे अखिल भारतीय अण्णाद्रमुख पक्ष. त्याच्याकडे 54 आमदार आहेत. सत्तेसाठी काँग्रेसने प्रमुख पक्षाबरोबर केलेल्या युतीतून बाहेर पडून टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेसचे जे आमदार निवडून आले ते केवळ द्रमुक पक्षाच्या मदतीमुळे, अन्यथा काँग्रेसला तिथे विजयी होणे देखील कठीण झाले असते. काँग्रेसच्या पाचही आमदारांनी टीव्हीके म्हणजेच विजय जोसेफ जो मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहे त्याला पाठिंबा देऊन देखील सत्तेवर येण्यासाठी किंवा स्पष्ट बहुमतासाठी आणखी सहा आमदारांची आवश्यकता होती. एवढे संख्याबळ विजय जोसेफ देऊ शकला नाही.

राज्यपाल आर्लेकरांची भूमिका

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आपल्यासमोर देशातील विविध उदाहरणे ठेवली. काही घटनात्मक तज्ञांचे सल्लेही घेतले. सर्वात मोठा असलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देणे ही परंपरा आहे, परंतु कित्येकवेळा स्पष्ट बहुमत नसताना देखील केवळ सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेसाठी बोलवायचे आणि नंतर आयत्यावेळी सभागृहात त्यांचा पराभव होतो. अशी घटना घडली जाऊ नये. म्हणून राज्यपाल आर्लेकर यांनी विजय जोसेफ यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास निमंत्रण दिले नाही.

बहुमताचा आकडा दाखवा

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे यापूर्वी गोव्याचे सभापती होते. त्यानंतर मंत्री देखील झाले. आता तामिळनाडूत त्यांनी जोपर्यंत बहुमताचा आकडा विजय जोसेफ दाखवत नाही तोपर्यंत त्यांना निमंत्रित करणे शक्य होणार नाही अशी ठाम भूमिका राज्यपाल म्हणून घेतल्यामुळे देशात बरीच खळबळ माजलेली आहे. अतिशय शांत आणि नेहमीच अत्यंत मवाळ पद्धतीने भूमिका घेणारे राजेंद्र आर्लेकर सध्या फारच कडक राहिले आहेत. राजकीय पक्षांकडून तसेच विशेषत: टीव्ही वृत्तवाहिन्यांचे प्रमुख, यांच्याकडून त्यांच्यावर होत असलेली जोरदार टीका, या सर्व पार्श्वभूमीवर आर्लेकर आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यामुळेच सध्या ते बरेच गाजत आहेत. ते केरळचेही राज्यपाल आहेत. तामिळनाडूची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली आहे. राज्यपाल आर्लेकर यांना अशी भूमिका घेण्यास केंद्रातील भाजप सरकार दबाव टाकीत आहे, अशा पद्धतीचा सूर देखील आता उमटू लागला आहे. एकंदरीत कोणत्याही वादात न पडणारे व मृदू भाषेतून बोलणारे राजेंद्र आर्लेकर हे देखील संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरु शकले, हा तसा पहिलाच प्रकार आहे. या साऱ्या प्रकाराकडे गोमंतकीय जनता देखील कुतुहलतेने पाहत आहे. अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आर्लेकरांनी कसे वागावे, याचे सल्ल्यावर सल्ले देत आहेत. यातून जनतेची देखील बरीच करमणूक होत आहे.

बंगालमध्ये गाजले गोव्याचे सतीश धोंड

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे गाजले ते गोव्याचे दुसरे सुपुत्र म्हणजे सतीश धोंड. ते बंगाल भाजपचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. नुकत्याच झालेल्या तेथील निवडणुकीत त्यांनी त्यांच्यातील संघटनकौशल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी सोपविलेल्या 126 पैकी तब्बल 100 जागांवर भाजपला विजय मिळवून देण्याची कामगिरी केल्याने तेही देशभर गाजत आहेत.

तामिळनाडू काँग्रेसचे निरीक्षक गिरीश चोडणकर

तामिळनाडूत राज्यपाल असलेल्या मवाळ राजेंद्र आर्लेकर यांनी आपली कडक भूमिका दाखविल्याने ते देशभरात गाजत असतानाच तामिळनाडू काँग्रेसचे निरीक्षक म्हणून काम पाहणारे गिरीश चोडणकर हे देखील गोव्याचेच. काँग्रेस पक्ष आज शुक्रवारी राज्यपालांच्या विरोधात तामिळनाडूमध्ये आंदोलन करणार आहे. आता त्याचे नेतृत्व देखील गिरीश चोडणकर करतात की काय, हे पहावे लागेल.

Advertisement
Tags :

.