For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतगणनेपूर्वी बॅनर्जी यांना तीन झटके

06:53 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मतगणनेपूर्वी बॅनर्जी यांना तीन झटके
Advertisement

मतदानोत्तर सर्वेक्षणे विरोधात, फेटाळली याचिकाही : पश्चिम बंगालच्या मतगणनेविषयी देशभरात सर्वाधिक उत्सुकता, उत्कंठा

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालसह चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणना आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांना पाठोपाठ तीन झटके बसले आहेत. हे झटके राजकीय, कायदेशीर आणि प्रशासकीय अशा प्रकारांचे आहेत.

Advertisement

गेल्या बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदानोत्तर सर्वेक्षणे प्रसिद्ध करण्यात आली. एका सर्वेक्षणाचा अपवाद वगळता इतर सर्व सहा सर्वेक्षणे त्यांच्या विरोधात गेली आहेत. एका सर्वेक्षणात तृणमूल काँग्रेस विजयी होणार असे भाकित करण्यात आले असून, तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार, असा निष्कर्ष सहा सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. हा ममता बॅनर्जी यांना बसलेला राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, त्यांनी या सर्वेक्षणांचे निष्कर्ष नाकारले असून हे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान असल्याचा त्यांचा आरोप आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी राज्यात सत्तापरिवर्तन होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

फेटाळली याचिकाही

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतगणना करण्यासाठी जी पद्धती निर्धारीत केली आहे, तिला आव्हान देणारी याचिका तृणमूल काँग्रेसने कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करण्यात आली. तथापि कलकत्ता उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी मतगणनेसाठी राज्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत साहाय्यक म्हणून केंद्रीय अधिकारी आणि केंद्रीय सार्वजनिक संस्थांमधील अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत काहीही अवैध नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. आणखी एक याचिका याच पक्षाच्या एका नेत्याने सादर केली होती. ती मतगणना केंद्र अन्यत्र हलविण्यासंबंधी होती. मात्र, मतगणना केंद्र अन्यत्र हलविण्यात काहीही चुकीचे नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ही याचिकाही फेटाळली. हा बॅनर्जी यांच्यासाठी यांना बसलेला कायदेशीर धक्का आहे.

स्ट्राँगरुम नाट्या

ममता बॅनर्जी निवडणूक संघर्षात असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील मतदानयंत्रांसंबंधी मोठा वाद गुरुवारी निर्माण झाला. या मतदानयंत्रांची खोली उघडण्यात आली असून मतदानयंत्रांमध्ये फेरफार केला जात आहे, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्ट्राँगरुमबाहेर धरणे धरले आणि घोषणाबाजी केली. ममता बॅनर्जी या देखील तेथे पोहचल्या. त्या तेथे चार तास होत्या. तथापि, मतदानयंत्रे ठेवलेली खोली उघडण्यात आली नसून त्याच्या बाजूची, टपाल मतपत्रिका ठेवलेली खोली उघडण्यात आली होती. ही नेहमीची प्रक्रिया आहे. कारण मतगणनेपूर्वी टपाल मतपत्रिकांचे परीक्षण आणि विभागणी करण्याची प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया प्रत्येक निवडणुकीच्या मतगणनेपूर्वी केली जाते. या बाबी उघड झाल्यानंतर बॅनर्जी यांच्या धरणे कार्यक्रमातील हवाच निघून गेली आणि त्यांना हा कार्यक्रम मागे घ्यावा लागला. हा त्यांना मिळालेला प्रशासकीय झटका आहे, असे मानण्यात येत आहे. अशा प्रकारे त्यांना मतगणनेपूर्वीच तीन मोठे धक्के बसले आहेत, असा विचारप्रवाह दिसतो.

अनेक केंद्रांवर पुनर्मतदान शक्य

द्वितीय टप्प्याचे मतदान होत असताना अनेक मतदारांनी प्रक्रियेविषयी तक्रारी केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग या तक्रारींचे अन्वेषण करीत आहे. फलाटा मतदारसंघात अनेक मतदान यंत्रांवरील ‘कमळ’ चिन्हावर टेप चिकटविलेली आढळून आल्याच्या तक्रारी आहेत. अशा वादग्रस्त मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा निर्णय झाल्यानंतर कदाचित रविवारी पुन्हा मतदान करण्याचा आदेश दिला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून दिली गेली आहे.

मतणनेसंबंधी उत्सुकता शिगेला

ड मतगणना प्रक्रियेला विरोध करणारी तृणमूल काँग्रेस पक्ष याचिका फेटाळली

ड मतदारांकडून आलेल्या तक्रारींमुळे अनेक मतदान केंद्रांवर पुनर्मतदान शक्य

ड भारतीय जनता पक्ष, तृणमूल काँग्रेस यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त

Advertisement
Tags :

.