तीन सत्रांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स- निफ्टी घसरणीत
सेन्सेक्स 322 अंकांनी घसरला, आयटी समभाग दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठा चढउतार पहायला मिळाला. शेअर बाजाराने सर्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर अखेरच्या क्षणी काहीशा घसरणीसोबत बाजार बंद झाला. सेन्सेक्स 322 अंकांनी घसरला होता. आयटी समभाग दबावात पहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 322 अंकांनी घसरत 85439 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 78 अंकांनी कमकुवत होत 26250 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 85883 या सर्वकालीक उच्चांकावर पोहोचला होता. बाजारातील दिग्गज एचडीएफसी बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यामुळे बाजारामध्ये घसरण पहायला मिळाली. गेल्या तीन सत्रामध्ये भारतीय शेअरबाजार तेजीसोबत बंद झाला होता.
समभागांची कामगिरी
विविध समभागांची कामगिरी पाहता नेस्ले इंडिया, बीईएल, आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस्, टाटा स्टील, व्होल्टास, सोलार इंडस्ट्रीज, प्रेस्टीज इस्टेट, भारत डायनॅमिक्स, अॅक्सिस बँक, सनफार्मा, सिप्ला, टाटा स्टील, टायटन, एसबीआय लाईफ, जेएसडब्ल्यू स्टील, ट्रेंट, अदानी पोर्ट आणि हिंडाल्को यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले.
दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, बजाज ऑटो, आयटीसी, एनटीपीसी, इंडिगो, विप्रो, ओएनजीसी, टेक महिंद्रा, मॅक्स हेल्थकेअर, कोल इंडिया, भारती एअरटेल, जिओ फायनान्स, श्रीराम फायनान्स, ग्रासीम आणि अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग घसरणीत राहिले होते.
क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता, ऑटो क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक तेजीत राहिला. यासोबत कमोडिटीज, एफएमसीजी, मेटल, सीपीएसई आणि रियल्टी निर्देशांक तेजीसमवेत बंद झाला.