For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन जागा जाहीर, चार जागांचे निकाल राखीव

01:06 PM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
तीन जागा जाहीर  चार जागांचे निकाल राखीव
Advertisement

डीसीसी बँक निवडणूक : बँकेवर जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व : विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष

Advertisement

चुरशीची निवडणूक

  • न्यायालयीन प्रक्रियेमुळे निकाल राखीव
  • 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर जाहीर होणार
  • निपाणी, हुक्केरी, कित्तूर, बैलहोंगलचा निकाल राखीव
  • अथणी, रायबाग, रामदुर्ग मतदारसंघाचा निकाल जाहीर

बेळगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. दिवसेंदिवस चर्चेत असलेल्या बँकेचा निकाल अनिर्णित स्थितीत राहिला. 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तीन मतदारसंघांचा निकाल जाहीर करण्यात आला असून न्यायालयीन प्रक्रियेमुळे चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. अथणी, रायबाग व रामदुर्ग मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला असून निपाणी, हुक्केरी, कित्तूर व बैलहोंगल मतदारसंघांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकंदरीत डीसीसी बँकेच्या निवडणुकीत जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व राहिल्याचे पहावयास मिळाले.

Advertisement

अथणी मतदारसंघातून लक्ष्मण सवदी विजयी झाले असून त्यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. त्यांना सर्वाधिक 125 मतदानापैकी 122 तर माजी आमदार महेश कुमठहळ्ळी यांना केवळ 3 मते मिळाली. तर रायबाग मतदारसंघातून आप्पासाहेब कुलगोड विजयी झाले असून त्यांना 205 मतदानापैकी 122 तर बसगौड आसंगी यांना 64 मते मिळाली. रामदुर्ग मतदारसंघातून मल्लाप्पा यादवाड विजयी झाले असून त्यांना 35 पैकी 19 मते मिळाली असून श्रीकांत ढवण यांना 16 मते मिळाली. निकालानंतर सायंकाळी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले.

रायबाग वगळता सर्व क्षेत्रात 100 टक्के मतदान

बँकेच्या निवडणुकीत एकूण 96.96 टक्के मतदान झाले. रायबाग वगळता बैलहोंगल, रामदुर्ग, अथणी, कित्तूर, रायबाग, निपाणी व हुक्केरी मतदारसंघात 100 टक्के मतदान झाले असून रायबाग मतदारसंघात 89.76 टक्के मतदान झाले. सोसायटीबाबत विविध कारणांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यामुळे रामदुर्ग, अथणी, रायबाग मतदारसंघांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर बैलहोंगल, कित्तूर, निपाणी व हुक्केरी मतदारसंघांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे राखीव ठेवण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर रोजी प्रकरणांची सुनावणी होणार असून यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

7 मतदान केंद्रांची स्थापना

बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये सकाळी नऊ वाजता मतदानाला सुऊवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा थंडा प्रतिसाद मिळाला. मात्र सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येत होते. मतदानासाठी मतदारसंघनिहाय केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. मतदारांना केंद्रावर येऊन मतदान करण्यासाठी ठिकठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे मतदारांना मतदान करणे सोपे झाले होते. प्रशासनाकडून एकूण 7 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती.

मतदान केंद्रावर येण्यास मज्जाव

मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर तपासणीसाठी चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तैनात केलेले कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करूनच मतदारांना आत मतदानासाठी सोडत होते. मतदारही याला प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत होते. दुपारी प्रवेशद्वावर मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर प्रशासनाकडून उमेदवार, कर्मचारी व पत्रकारांसाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार व पासाधारक वगळता इतरांना मतदान केंद्रावर येण्यास मज्जाव करण्यात आला होता.

उमेदवारांकडून विशेष वाहनांची व्यवस्था

सकाळी साडेनऊ ते पावणे एकच्या दरम्यान मतदार मतदान केंद्रावर  गटागटाने  दाखल होत होते. मतदानाला येण्यासाठी लांबचा पल्ला असल्याने मतदारांसाठी उमेदवारांकडून विशेष वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाकडून मतदारांचे ओळख पटविण्यासाठी 7 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. तर मतदानासाठी सात मतदारसंघनिहाय मतदान खोल्या निर्माण करण्यात आल्या होत्या. मतदारांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान करून जात असताना केंद्रावर उमेदवारांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती.

निवडणुकीत उमेदवारांनी लावला जोर

डीसीसी बँकेसाठी काही दिवसांपासून प्रचार व बैठकांचे सत्र सुरू आहे. तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी व आण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेलची स्थापना करण्यात आली होती. तर रमेश कत्ती व लक्ष्मण सवदी यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. याअगोदरच 9 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 7 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकीकडे सतीश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, आण्णासाहेब जोल्ले तर दुसरीकडे रमेश कत्ती व लक्ष्मण सवदी यांनीही निवडणुकीत जोर लावला होता.

यापूर्वीच 9 जागा बिनविरोध

यापूर्वीच 9 जागा बिनविरोध झाल्या आहेत. चिकोडी-गणेश हुक्केरी, कागवाड-राजू कागे, सौंदत्ती-विरुपाक्ष मामणी, गोकाव-अमरनाथ जारकीहोळी, बेळगाव-राहुल जारकीहोळी, खानापूर-अरविंद पाटील, यरगट्टी-विश्वास वैद्य, मुडलगी- निलकंठ कप्पालगुद्दी तर इतर सहकारी संस्था गटातून चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता अथणी, रायबाग व रामदुर्ग मतदारसंघांचा निकाल लागला असून उर्वरित मतदारसंघांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

समर्थकांचा जल्लोष, गुलाची उधळण

निकालाची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण सवदी, आप्पासाहेब कुलगोड, मल्लाप्पा यादवाड समर्थकांनी मोठा जल्लोष केला. समर्थकांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तसेच विजयाच्या घोषणांनी मतदान केंद्र परिसर दणाणून गेला होता. तसेच समर्थकांनी लक्ष्मण सवदी यांचा फोटो असलेले झेंडे घेऊन वाद्याच्या तालावर आनंद व्यक्त करत होते. तर आप्पासाहेब कुलगोड व मल्लाप्पा यादवाड यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त करत होते.

मतदान केंद्र परिसरात जमावबंदी

मतदान केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी परिसरात 200 मीटर परिसरात दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत कलम 163 लागू केले होते. डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध तालुक्यातून मतदान केले जाते. यामुळे निवडणुकीवेळी अनेक तालुक्यातील उमेदवार समर्थक मोठ्या संख्येने येतात. यामुळे मतदान केंद्र परिसरात मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यामुळे मतदान व मतमोजणीदरम्यान मोठा जमाव होता. तसेच निकालानंतर विजयी उमेदवार व पराभूत झालेल्या समर्थकांमध्ये झटापट होऊ शकते. यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) 2023 अंतर्गत कलम 163 लागू करण्यात आला होता.

जिल्हा प्रशासनाकडून नेटके नियोजन

जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रावर नेटके नियोजन करण्यात आले होते. मतदारांना मतदान करणे सोपे व्हावे, या उद्देशाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रावर येण्या-जाण्यासाठी बॅरिकेड्स लावून विभागणीही करण्यात आली होती. प्रशासनाकडून आपत्कालीन सुविधेसाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, तैनात केले होते. तसेच केंद्रावर शौचालयाचे नियोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती.

निवडणूक प्रक्रिया शांततेत

बेळगाव मध्यवर्ती बँकेची निवडणूक अत्यंत शांततेत पार पडली. मतदार शांततेत येऊन मतदान करत होते. मतदान केंद्रावर अत्यंत सौहार्दतेचे वातावरण होते. मतदान केंद्रावर एकप्रकारे मैत्रीपूर्ण वातावरण असल्याचे दिसून आले. निवडणूककाळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. मात्र मतमोजणी झाल्यानंतर एकमेकांशी संवाद असल्याचेही पहावयास मिळाले. मतदानावेळी व मतमोजणीनंतर उमेदवार असो किंवा मतदार एकमेकांची विचारपूस करत होते.

चोख पोलीस बंदोबस्त

मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आयनॉक्स थिएटर व  ग्लोब थिएटरपासून मतदान केंद्रावर येण्यासाठी असलेला रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला होता. या मार्गावरून होणारी वाहतूक इतर मार्गावरून हलविण्यात आली होती. संबंधित कर्मचारी, पत्रकार व मतदारांनाच प्रवेश देण्यात येत होता. त्याचबरोबर पोलिसांकडूनही तपासणी करूनच मतदान केंद्रावर सोडण्यात येत होते. मतदान केंद्र परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

रायबागमधील दोन गटांमध्ये तणाव

रायबाग मतदारसंघातील बसगौडा आसंगी समर्थक काही मतदारांना प्रती देण्यात न आल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन गटांमध्ये शहरातील एका खासगी हॉटेल आवारात हमरीतुमरी होऊन बाचाबाची झाल्याचेही समजते. सदर प्रकरणे कॅम्प पोलीस स्थानकापर्यंत नेण्यात आले होते. बसगौडा आसंगी समर्थक मतदारांनी आप्पासाहेब कुलगोड यांनी आपल्याला मतदान करता येऊ नये, यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप करून फेरमतदान घेण्याचीही मागणी करत होते.

Advertisement
Tags :

.